खराब हवामानामुळे परतीचा प्रवास लांबणीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 14 जुलैनंतरच पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्रवारी यासंबंधीचे अपडेट्स जारी केले. शुभांशूसह चार क्रू सदस्य अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पोहोचले असून त्यांना आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. पूर्वनियोजनानुसार त्यांची ही मोहीम 14 दिवसांची होती. त्यानुसार 10 जुलैपर्यंत परतण्याची अपेक्षा होती. मात्र, शुभांशू शुक्ला आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा मुक्काम खराब हवामानामुळे वाढल्याचे सांगण्यात आले.
अॅक्सिओम मोहीम 25 जून रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आली होती. ड्रॅगन अंतराळयान 28 तासांच्या प्रवासानंतर 26 जून रोजी ‘आयएसएस’वर दाखल झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्याविषयीचे अपडेट्स मिळत आहेत. यापूर्वी 6 जुलै रोजी आयएसएस स्थानकावरून शुभांशूचे काही फोटो समोर आले होते. ज्यामध्ये शुभांशू क्युपोला मॉड्यूलच्या खिडकीतून पृथ्वीकडे पाहताना दिसला होता. क्युपोला मॉड्यूल ही घुमटाच्या आकाराची निरीक्षण खिडकी असून यामध्ये 7 खिडक्या आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्या इतर तीन साथीदारांचे 14 जुलैपूर्वी परतणे शक्य नसल्याचे संकेत युरोपियन अंतराळ संस्थेने दिले आहेत. अॅक्सिओम-4 मिशन क्रूच्या पृथ्वीवर परतण्यास विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि हंगामी घटकांशी संबंधित कारणे आहेत. त्यामुळे 14 जुलै रोजीही परतण्याची पुष्टीही निश्चित आहे असे म्हणता येणार नाही.
अंतराळ स्थानकाचे लाईव्ह दर्शन
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगरच्या आकाशावरून गेले. जमिनीवरून ते सहा मिनिटांसाठी पाहता आले. यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेने युट्यूबवर एक लिंक जारी केली होती. या लिंकच्या माध्यमातून शेकडो लोकांनी अंतराळ स्थानकाचे लाईव्ह दर्शन घेतले.









