पर्थ :
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्यादरम्यान संयुक्त सैन्याभ्यास ‘अस्त्रहिंद 2025’ची सुरवात सोमवारी पर्थ येथे झाली आहे. पर्थच्या इरविन बॅरकमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला असून या सैन्याभ्यासात दोन्ही देशांचे सैन्य शहरी आणि निमशहरी भागांमध्ये संयुक्त मोहिमांचा सराव करतील, ज्यामुळे परस्पर ताळमेळ आणि संचालन क्षमतेला चालना मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. हा सैन्याभ्यास दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान संयुक्त अभियानांना मूर्त स्वरुप देण्याची क्षमता विकसित करणे, परस्पर विश्वास वाढविणे आणि संरक्षण सहकार्याला मजबूत करण्यावर केंद्रीत आहे. अलिकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला आहे. यापूर्वी अस्त्रहिंद सैन्याभ्यास नोव्हेंबर 2024 मध्ये पुण्यातील फॉरेन ट्रेनिंग नोडमध्ये पार पडला होता. यात दोन्ही सैन्यांनी शत्रूच्या तळांवर छापेमारी, जखमी सैनिकांना युद्धक्षेत्रात प्राथमिक उपचार देण्यासारख्या युद्धसदृश स्थितींच्या तयारींचा अभ्यास केला होता.









