दोन दिवसांत बैठक : नुकसानभरपाईनंतरच कामाला सुरुवात करा
बेळगाव : शेतकऱ्यांची तिबार पीक देणारी जमीन सांडपाणी प्रकल्पासाठी हिसकावून घेऊन शासनाने त्यावर प्रकल्प सुरू केला आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयेसुद्धा दिला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी हलगा सांडपाणी प्रकल्पाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन केले. रात्री उशिरा महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि पाणीपुरवठा मंडळाचे साहाय्यक अभियंते अशोक शिरुर यांनी भेट देऊन लवकरच याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. मात्र शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत कामबंद ठेवावे, असा आग्रह धरला. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिले आहे. त्यामुळे आता किमान तीन दिवस तरी कामबंद ठेवण्यात आले आहे. आपली नुकसानभरपाई दिल्यानंतरच कामाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकल्पासाठी हलगा येथील सुपीक जमीन शेतकऱ्यांवर दडपशाही करत हिसकावून घेण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
5 जानेवारी 2019 रोजी पिकांवर जेसीबी फिरवून जमीन ताब्यात घेण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, गयावया केली. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत ही जमीन हिसकावून घेतली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिलीच नाही. मात्र त्याठिकाणी प्रकल्पासाठी इमारती तसेच इतर बांधकाम करण्यात आले आहे. एक तर जमीन नाही, नुकसानभरपाई नाही आणि काम पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि अशोक शिरुर यांनी येत्या दोन दिवसांत निश्चितच यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.









