विजयोत्सवावेळी चेंगराचेंगरीत 11 जणांचा झाला होता मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाच्या विजयोत्सवावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या 11 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक देण्यात येईल, अशी घोषणा आरसीबीच्या फ्रॅन्चाईजीने केली आहे.
बेंगळुरात 4 जून 2024 रोजी चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर फ्रॅन्चाईजीने आरसीबी केअर्स सुरू केले असून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच आरसीबी केअर्समार्फत आणखी मदतीचा हात देण्याचे आणि कार्यक्रम आयोजिण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
आरसीबीने आपल्या ‘एक्स’ पोस्टवर अपलोड केलेल्या संदेशात 4 जून 2025 हा दिवस आमच्या हृदयात कायमचा राहील. आम्ही फक्त 11 चाहते गमावले नाहीत. ते आमच्या कुटुंबाचे सदस्य होते, ते आमच्या हृदयाचा भाग होते. त्यांचा उत्साह हा आमच्या शहराला, समुदायाला आणि संघाला प्रोत्साहन देणारा प्रकाश होता. ते आमच्या स्मरणात कायम जीवंत राहतील. कोणतीही मदत त्यांच्या कुटुंबीयांची पोकळी भरून काढू शकत नाही. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदराचे प्रतिक म्हणून आरसीबीने प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही तर भावना, विश्वास आणि सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन वचनबद्धता आहे, असा उल्लेख केला आहे.









