केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचे आश्वासन
अहिल्यानगर :
.महाराष्ट्रातील सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे अतिव़ृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकारने याबाबत माझ्याशी चर्चा केली आहे आणि मदतही मागितली आहे. या सहकाराच्या पंढरीमध्ये मी शेतकऱ्यांना आश्वस्थ करतो की येथील नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच तातडीने महाराष्ट्राला परिपूर्ण मदत दिली जाईल. पंतप्रधान मोदींच्यावतीने मी हे आश्वासन देत असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
पंतप्रधान लगेच मदत जाहीर करतील
अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारनेपंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा. त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील. महाराष्ट्रातील या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्हीसुद्धा खंबीरपणे आहोत, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
सहकाराच्या पंढरीत शब्द दिलाय
आज प्रवरानगरमध्ये आलो आहे. खरं तर ही भूमी सहकार क्षेत्रातील पंढरी मानली जाते. याचं मूळ कारण हे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आहेत. त्यांनी त्यांचं सर्व जीवन हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. याबाबत मी सविस्तर बोलणारच आहे. मात्र, या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं आहे, असे महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकारने मला सांगितले. या वर्षांसाठी केंद्र सरकारने शेअर्सच्या माध्यमातून 3132 कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यामधील 1631 कोटी रुपये एप्रिलमध्ये देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं आहे. तथापि महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खंबीरपणे उभे करण्याचे काम आम्ही निश्चितच करु, असे अमित शहा यांनी सांगितले.
महाराष्ट्रही राबतेय उपाय योजना
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करत आहे. 2215 कोटींचा रिलीफ फंड महाराष्ट्र सरकारने दिला आहे. त्यामध्ये 10 हजार रुपयांची प्रत्येकी रोख मदत आणि 25 किलो धान्य देण्यात येत आहे. तसेच कर्जाची वसुलीही या मदतीतून रोखण्यास सांगण्यात आलेलं आहे. केंद्रीय स्तरावरुनही बँकांना तसे सूचित करु, असे आश्वासन शहा यांनी दिले.
महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे
महाराष्ट्र सरकामधील हे त्रिमूर्ती आहेत. यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. मला पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवलं आणि विचारलं की केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कालच माझ्याबरोबर महत्वाची बैठक केली. तेव्हा मी पंतप्रधान मोदींच्यावतीने त्यांना आश्वासन दिलं की महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवावा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत. ते मदत जाहीर करतील. कारण महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांचं हित जोपासणारं सरकार निवडून दिलेलं आहे, असे गौरवपूर्ण उद्गारही अमित शहा यांनी काढले.कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मदत कपात कारखान्यांच्या नफ्यातून
राज्यातील पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीत 10 रुपये घेतले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कारखान्याचे मालक शेतकरी आहेत, हे विरोधकांनी विसरु नये आणि या आपत्तीचे राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन एकूण 15 रुपये कपात करण्याच्या निर्णयावर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. यातील 5 रुपये थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, काही साखर कारखाने मालकांनी आम्हाला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत पण आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ. बाधित शेतक्रयांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. मागे उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की, तीस तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातून पाच रुपये हे शेतकऱ्यांकरिता बाजूला काढून ठेवा. ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीचे पैसे हे शेतकऱ्याचे आहेत. नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आपण विचार केला तर राज्यात 200 कारखाने आहेत. फार फार तर 25 लाख रुपये एका शेतकऱ्यासाठी बाजूला काढून द्यायला सांगितलं. तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी असा गजब उभा केला. म्हणाले की शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करत आहात. आम्ही शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत नाही तर कारखान्यातल्या नफ्यातून 25 लाख रुपये हे जो शेतकरी तुमच्याकडे शेतमाल टाकतो, तुमच्यासाठी राबराब राबतो, हाडाची काडं करतो, रक्ताचे पाणी करतो त्या शेतकऱ्यांसाठी देत आहोत. अशा प्रकारची आपत्ती आल्यावर आम्ही तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तेव्हा तुम्ही मागे पुढे पाहता. आता मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत. ज्यांच्याकडे शेतक्रयाच्या मालाला काटा मारला जातो त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून तिथे पैसे जमा करताय आणि शेतकऱ्यांकरिता 25 लाख रुपये द्या म्हटलं की तुम्हाला देण्याची दानत नाहीये, असे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तुम्ही कारखान्याचे मालक नाही. त्या कारखान्याचा मालक आमचा शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहण्याचे काम सरकार निश्चितपणे करणार आहे आज आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. ही लोकं आपत्तीचही राजकारण करू इच्छितात. पण त्यांना मी सांगतो की काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल या संदर्भात आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे. तुम्ही आरशात पहा, तुम्ही असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं हे आधी दाखवून द्या आणि मग आमच्यावर टीका करा. आमच्यावर कोणीही टीका केली तरी आम्ही परवा करणारी लोक नाही आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.








