कंधार विमान अपहरणाशी कनेक्शन : दहशतवादी पाकिस्तानात लपून
वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकिस्तानातून भारताच्या विरोधात कट रचणाऱया दहशतवाद्याची संपत्ती एनआयएने जप्त केली आहे. तपास यंत्रणेने अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक आणि मुख्य कमांडर मुश्ताक जरगर उर्फ लट्रामची श्रीनगरमधील संपत्ती जप्त केली आहे. कुख्यात जरगरची जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरसोबत कंधार विमान अपहरणावेळी सुटका करण्यात आली होती. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान 814 चे अपहरण करत ते अफगाणिस्तानातील कंधारमध्ये दहशतवाद्यांनी नेले होते. प्रवाशांच्या बदल्यात मसूदसोबत जरगरची भारतीय यंत्रणांना सोडले होते. दहशतवादी जरगर हा 1989 मध्ये तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईद यांच्या अपहरणातही सामील होता. श्रीनगरच्या गनई भागातील जरगरच्या दोन घरांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयए पथकाने जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांसोबत मिळून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. जरगरच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. सुटका झाल्यापासून जरगर हा पाकिस्तानात आश्रयास असून तेथूनच काश्मीर खोऱयात कारवाया घडवून आणू पाहत आहे. जरगर यापूर्वी जम्मू-काश्मीर लिबरेशन प्रंटमध्ये सक्रीय होता. या संघटनेने जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. जरगर हा हत्यांसमवेत अनेक क्रूर गुन्हय़ांमध्ये सामील होता. अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांशीही त्याचे संबंध असल्याचे सांगण्यात येते.
युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित
जरगरला केंद्र सरकारने युएपीएच्या चौथ्या अनुसूचीच्या अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. जरगर हा श्रीनगरच्या नौहट्टाचा रहिवासी आहे. 1989 मध्ये रुबैया सईदचे अपहरण करणाऱयांमध्ये त्याचा समावेश होता. 5 दहशतवाद्यांच्या बदल्यात रुबैयाला सोडण्यात आले होते. जरगरला 15 मे 1992 रोजी अटक करण्यात आली होती. तर 31 डिसेंबर 1999 रोजी कंधार येथे विमानातील प्रवाशांच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले होते.