जयशंकर यांच्या वाहनासमोर निषेध केल्याने कारवाई सुरू
वृत्तसंस्था/लंडन, नवी दिल्ली
ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थक आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा मार्ग रोखल्याची बाब केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. भारतीय तपास संस्था या प्रत्येक निदर्शकाची ओळख पटवण्यासाठी सक्रिय झाले आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आंदोलकांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांनी खलिस्तान समर्थकांच्या भारतीय कनेक्शनची चौकशी सुरू केली आहे. ओळख पटल्यानंतर संबंधित खलिस्तान समर्थकांची मालमत्ता गोठविली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी भारतीय उच्चायुक्तालयासमोर हिंसक निदर्शने करणारे काही निदर्शकही या निदर्शनात सहभागी असू शकतात, अशी भीती तपास यंत्रणांना आहे. गुप्तचर सुरक्षा संस्थांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भारतात उपस्थित असलेल्या या खलिस्तानी समर्थकांचा सहभाग आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांचा हात असल्याचे सिद्ध झाले तर त्यांच्या मालमत्तेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या हिंसक निदर्शनाच्या प्रकरणाची चौकशी करत असून यासंदर्भात भारतीय तपास यंत्रणा ब्रिटिश तपास संस्थांच्या सतत संपर्कात आहेत.
जयशंकर लंडन दौऱ्यावर
परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर लंडन दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्याने ब्रिटनवरील राजनैतिक दबाव वाढला आहे. ब्रिटनच्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत त्याला खलिस्तानी गुंडांनी केलेला हल्ला असे संबोधले आहे. गुरुवारी संध्याकाळी लंडनमधील चॅथम हाऊसच्या बाहेर जयशंकर यांचे वाहन अडवण्याची घटना घडली होती. यावेळी खलिस्तानी निदर्शकानी सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन करत जयशंकर यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता.









