2020-2021 मध्ये एकंदर 1,373 कोटी रुपयांची कमाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील आठ महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांनी त्यांची मालमत्ता घोषित केली आहे. या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँगेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, तृणमूल काँगेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी अशी या आठ पक्षांची नावे आहेत.
या सर्व पक्षांनी 2020-2021 या एक वर्षाच्या कालावधीत एकंदर 1,373 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी 55 टक्क्यांहून अधिक धन भाजपला देण्यात आलेले असून ही रक्कम 752.337 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, ही रक्कम गेल्यावर्षीपेक्षा 79.24 कोटी रुपयांनी कमी आहे. दुसऱया क्रमांकावर काँगेस असून या पक्षाला 285.765 कोटी रुपये आहे. काँगेसच्या प्राप्तीत गेल्या वर्षीच्या 682.21 कोटीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.
तृणमूल काँगेस, राष्ट्रवादी काँगेस, बसप, सीपीआय आणि एनपीपी या पक्षांच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. ही घट गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत अनुक्रमे 48.20 टक्के, 59.19 टक्के, 9.94 टक्के आणि 67.65 आणि 62.91 टक्के इतकी आहे, अशी माहिती सूत्रांनी पत्रकारांना दिली.
खर्चातही भाजप आघाडीवर
2020-2021 या आर्थिक वर्षात खर्चाच्या संदर्भातही भाजपने आघाडी घेतली. या पक्षाने 421.014 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय या पक्षाने स्वतःच्या व्यवस्थापनासाठी 145.688 कोटी रुपये खर्च केले. काँगेसने निवडणूक खर्चासाठी 91.358 कोटी रुपये खर्च केले. काँगेसचा स्वतःसाठीचा खर्च 88.439 कोटी आहे. तृणमूल काँगेसचा खर्च याच वर्षी 90.419 रुपये इतका झाला.
अद्याप सर्व राष्ट्रीय पक्षांनी त्यांच्या मालमत्ता आणि उत्पन्न घोषित केलेले नाही. मात्र, बहुतेक राजकीय पक्षांच्या उत्पन्नात घट झालेली असणे शक्य आहे. हा कोरोना काळातील आर्थिक मंदीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.









