बेळगावात आजपासून विधिमंडळ अधिवेशन : अनुभव मंटपचे लोकार्पण : मान्यवरांची उपस्थिती राहणार
बेळगाव : सुवर्णसौध येथे सोमवार दि. 9 पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाचे अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी केले. सुवर्णसौधच्या खोली क्र. 238 मध्ये रविवार दि. 8 रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवारी सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. तत्पूर्वी 10.30 वाजता अनुभव मंटपाच्या धर्तीवरील तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होईल. यावेळी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, पालकमंत्री आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथग्रहण समारंभही यावेळी होईल, असे यु. टी. खादर यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात सल्ला समितीची बैठक होणार आहे. या सभेमध्ये अधिवेशनातील पुढील दिवसांची रुपरेषा ठरविण्यात येईल. यंदाच्या अधिवेशनात पाच विधेयकांवर प्रदीर्घ चर्चा होणार आहे. दोन अध्यादेशाऐवजी विधेयकांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनात दहा दिवस प्रश्नोत्तरासाठी काही वेळ निश्चित करण्यात आला आहे. लक्षवेधी सूचना, शून्य तास यासारख्या प्रश्नांवर चर्चा होईल. यंदाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने 3 हजार 4 प्रश्न, 205 लक्षवेधी सूचना, याशिवाय 3 खासगी विधेयकेही स्वीकारण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.
अधिवेशनासाठी 2500 अधिकारी-कर्मचारी व चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. सुमारे 6 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी यासह एकूण 8,500 अधिकारी-कर्मचारी यांचा अधिवेशनात सहभाग राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दहा समित्यांची स्थापना केली असून निवास, वाहतूक यासारख्यांची व्यवस्था चोख केली आहे. सुवर्णसौधच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येण्यासाठी बसची व्यवस्था आहे. अधिवेशनाचे काम पाहण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक येत असतात. यावर्षीही अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त भरविण्यात येणारे छायाचित्र प्रदर्शन विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे, अशीही माहिती यु. टी. खादर यांनी दिली. विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
अधिवेशनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचा घेतला आढावा
विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी रविवार दि. 8 रोजी सुवर्णसौधला भेट देऊन अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. पहिला मजला, दुसऱ्या मजल्यावर अधिवेशनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम याचाही त्यांनी आढावा घेतला. अनुभव मंडपाच्या भव्य तैलचित्राची पाहणी त्यांनी केली.
कर्मचारी-कामगारांशी साधला संवाद
विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्य करत असलेल्या कर्मचारी व कामगारांशी संवाद साधला. सुवर्णसौध परिसरात स्वच्छता व व्यवस्था चोखपणे करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अधिवेशनानिमित्त अनुभव मंटपचे तैलचित्र
जगद्ज्योती बसवेश्वर यांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपला जागतिक स्तरावर स्थान असून आजही काही समारंभात अनुभव मंटपाच्या धर्तीवर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यंदाच्या अधिवेशनानिमित्त अनुभव मंटपचे तैलचित्र तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सुवर्णसौधच्या पहिल्या मजल्यावर सोमवारी सकाळी 10.30 वा. तैलचित्राचे अनावरण होणार आहे.









