प्रतिनिधी/ पणजी
रमेश तवडकर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी भाजपच्यावतीने गणेश गावकर यांच्या नावाची शिफारस करण्याचे ठरविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पदाच्या निवडीसाठी येत्या दि. 25 रोजी विधानसभेचे खास एक दिवशीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यासंबंधी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आदेश जारी केला आहे.
ही निवड बिनविरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्षांकडूनही उमेदवार उतरविण्याचे ठरविण्यात आले आहे. यापूर्वी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या दोन्ही पदांवर अनुक्रमे रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांची वर्णी लागली आहे.
हे राजीनामे आणि मंत्रीपदी वर्णी यामुळे सभापतीपद रिक्त झाले असून भाजपतर्फे डॉ. गांवकर यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. विरोधी पक्षांकडून त्यांच्या बैठकीनंतर योग्य उमेदवारासंदर्भात निर्णय होणार आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले.









