कामकाजाचा दिवस पुढे ढकलण्याची मागणी सर्वांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे
पणजी : राज्य विधानसभा अधिवेशनाच्या तारखा सरकारने निश्चित केल्या खऱ्या परंतु, श्रीरामभक्त असलेल्या भाजपच्या नेत्यांच्या ‘श्रीरामनवमी’ लक्षात आलेली नाही. कामकाजाच्या बरोब्बर चौथ्या दिवशी म्हणजेच दि. 30 मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सव असल्याने आता कामकाजाचा दिवस पुढे ढकलावा लागणार आहे. गोव्यात महाशिवरात्री एवढाच मोठा सण तथा उत्सव श्रीरामनवमी दिवशी होतो. संपूर्ण गोव्यात मोठ्या उत्साहात आणि भरगच्च कार्यक्रमांनिशी श्रीरामनवमी थाटात साजरी होते. बहुतांश आमदार हे देखील श्रीरामनवमीला दुपारी रामजन्मोत्सवाला उपस्थित राहत असतात. त्यातच भाजप आणि श्रीराम यांचे नातेही वेगळ्dया पद्धतीचे आहे. गोव्यातील भाजप सरकारने मात्र याचा विचार केला नसावा किंवा ते लक्षात आले नसावे. ऐन रामनवमी दिवशी विधानसभा अधिवेशन असल्याने सर्वांच्याच अडचणी वाढल्या आहेत. देशभरात सार्वजनिक सुट्टी असते. गोव्यात मात्र मर्यादित सुट्टी आहे. त्यामुळे रामनवमी दिनी विधानसभेचे कामकाज असू नये, अशी मागणी जोर धऊ लागलेली आहे.
काँग्रेस सरकारमध्येही घडला होता असाच प्रसंग
यापूर्वी देखील असाच प्रसंग आला होता. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांमध्ये एक दिवस रामनवमी होती. त्यावेळी सभापतीपदी प्रतापसिंह राणे हे होते. विरोधी पक्षनेतेपदी मनोहर पर्रीकर होते. गोव्यात रामनवमी उत्सव सर्वत्र जोरात असतो. भाविकांना या उत्सवाला जाता येणार नाही त्यामुळे अधिवेशनाचा एक दिवस पुढे ढकलावा अशी लेखी मागणी मनोहर पर्रीकर यांनी आपल्या इतर आमदारांच्या सहकार्याने सरकारला केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सदर मागणी त्वरित मान्य केली. अधिवेशन रामनवमी दिवशी स्थगित केले आणि कामकाजाचा एक दिवस पुढे वाढविला होता. दिगंबर कामत यांचे त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. आता गोव्यात भाजपचेच सरकार सत्तेवर आहे. मुख्dयामंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल. परंतु, 3 एप्रिल रोजी विधानसभेचे कामकाज एका दिवसाने वाढवून घेणे संयुक्तिक ठरणार आहे.









