पाच राज्यातील निवडणूकांची घोषणा एकदाची झाली. या निवडणूकांचे एक वैशिष्ट्या म्हणजे या पाचही राज्यात सत्ताधारी भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. वाजपेयी-अडवाणी यांच्या काळापासून राज्यातील एका प्रमुख नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून त्याच्या नावावर निवडणूक लढवण्याचा शिरस्ता भाजप पाळत होता. याने बरेचदा भाजपचे भले झाले होते. कधीकधी असा उमेदवार अनपेक्षितपणे वेगळा आणला तर त्याने भाजपचे नुकसानदेखील झालेले आहे. दहा वर्षांपूर्वी दिल्लीत किरण बेदी या पक्षात नव्याने आलेल्या. त्यांना पुढे करून भाजपने निवडणूक लढवली. ती पक्षाला महागात पडली. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीवर आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने मदत झाली होती. त्यावेळी भाजपकडे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासारखा जुनाजाणता नेता होता. पण मोदींना आपल्याला सोयीस्कर नेतृत्व हवे होते. त्याचा परिणाम भाजप अजून भोगत आहे.
आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपकडे तालेवार नेते असूनदेखील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचे राजकारण उफराटे का कसे? चांगले अथवा वाईट? ते कालांतराने दिसेल. पण त्याने पक्षांतर्गत वातावरण बरेच तापले आहे. ते वेळीच शमवले नाही तर परिस्थिती मोदी-शहा यांच्या अंगलट येऊ शकते. राज्यातील नेते पंतप्रधानांचेदेखील ऐकत नाहीत असे चित्र भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशमध्ये दिसले होते. त्याची पुनरावृत्ती या तीन राज्यात होणार काय? याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
या साऱ्या निवडणूका भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढणार आहे. भाजपचे ते एकमेव तारणहार आहेत असाच संदेश दिला जात आहे. ‘सब कुछ मोदी’ ची रणनीती किती सयुक्तिक याबाबत वाद असू शकेल. पण मोदींचे नेतृत्व आल्यापासून भाजप बहरला आहे हे तेव्हढेच सत्य आहे. वेगवेगळे प्रयोग करण्यात मोदींचा हातखंडा आहे पण सध्याचा हा प्रयोग म्हणजे इंदिरा गांधी शक्तिशाली असताना केलेल्या प्रयोगांची आठवण देतो आहे हेदेखील तेव्हढेच खरे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील पराभवानंतर ब्रँड मोदीची काहीच मोडतोड झालेली नाही असे भासवण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल. राज्यातील प्रस्थापित नेत्यांना घरी बसवून या राज्यात नवीन सुरुवात करण्याचा हा प्रयत्न आहे, असे बोलले जात आहे. यात बरेच काही तथ्य आहे. पक्षाला जेव्हा नवीन नेता लाभतो आणि तो प्रस्थापित होतो तेव्हा तो राज्या राज्यात देखील आपलीच टीम आणू बघतो अथवा आपल्याच होयबांना नेमू इच्छितो. अशावेळी जुन्या नेत्यांना एकदम कांडात काढण्यात येते. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मार्गदर्शक मंडळात त्यामुळेच घातले गेले.
लोकसभा निवडणूक फार जवळ आलेली असताना खेळलेल्या या खेळीचा बरावाईट परीणाम हा लोकसभेच्या निकालांवरदेखील होऊ शकतो. या निवडणूका म्हणजे लोकसभेची सेमी-फायनल आहे असे म्हणण्यात मात्र जाणकारात वाद होऊ शकतात. भाजपमध्ये घमासान सुरु आहे. मोदी-शहा यांच्या निशाण्यावर सध्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग हे आहेत. चौहान हे भाजपच्या इतिहासात सर्वात जास्त वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 18 वर्ष मुख्यमंत्रीपदी पूर्ण करून पक्षात मोदींपेक्षा आपण जेष्ठ आहोत असे दाखवले आहे. चौहान यांची उमेदवारी भाजपने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्यानंतर करून मुख्यमंत्र्यांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले.
‘मामा’ म्हणून विख्यात असलेल्या चौहान यांनी आपले उपद्रवमूल्य आहे, आपण एकदमच टाकाऊ नाही असे जेव्हा पक्षाला दाखवायला सुरुवात केली तेव्हा कोठे त्यांचे नाव बुधनी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाहीर झाले. ‘मी निवडणूक लढवू का नको? मी परत मुख्यमंत्री बनावे का?’, असे प्रश्न चौहान यांनी एका जाहीर सभेत विचारले आणि दिल्लीश्वर सावध झाले. मध्यप्रदेशमध्ये बरेच केंद्रीय मंत्री आणि खासदार भाजपने रिंगणात उतरवले असले तरी अजूनही राज्यात चौहान यांच्याइतका सर्वमान्य नेता नाही असे राजकीय जाणकार सांगतात. जो कोणी भाजप नेता थोडे डोके वर काढू पाहतो त्याला शिताफीने कापण्यात चौहान तरबेज राहिलेले आहेत. निवडणुकीत भाजप हरले तर त्याचे एक कारण चौहान यांनी पक्षश्रेष्टींवर सूड उगवला आहे असे मानावे लागेल.
कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपचे बस्तान ठीक बसलेले नाही हे मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये तिकीटवाटपानंतर पक्षांतर्गत जी बंडाळी दिसून येत आहे त्याने कळत आहे. पक्षाचे चाणक्य अमित शहा थोडे नरमल्यासारखे दिसत आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे तिकीट अजून जाहीर झालेले नाही आणि एकेकाळी त्यांचे समर्थक राहिलेले राज्यवर्धन सिंग राठोड हे मोदी राज्यात आता नवीन नेतृत्व आणणार आहेत असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत. राजस्थान कोणत्याही परिस्थितीत भाजप जिंकेल असा विश्वास मोदी-शहा यांना वाटत असल्याने तिथे देखील तिकीटवाटपात वसुंधरा समर्थकांचे शिरकाण सुरु झाले आहे. दर पाच वर्षांनी सरकारे बदलण्याचा राजस्थानचा इतिहास आहे. काँग्रेसशी जोरदारपणे दोन हात करता यावेत याकरता भाजपने तिकीटवाटपात जातीय समीकरणे चांगली साधली आहेत. हादरलेले वसुंधरा समर्थक बंड करण्याच्या मूडमध्ये आहेत असे बोलले जाते. वसुंधरा अजून शांत असल्या तरी ती वादळापूर्वीची शांतता आहे, असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. असे प्रत्यक्षात घडले तर राजस्थानमधील ही निवडणूकच आगळी ठरेल आणि ती कशी फिरेल ते सांगता येत नाही.
एकीकडे वसुंधरा राजे यांचे कांडात काढले जात असताना मध्य प्रदेशमध्ये मात्र त्यांचे पुतणे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाग्य उजळत आहे, असे बोलले जाते. त्यांना भाजपचे भावी मुख्यमंत्री मानले जाते. शिंदे यांची आजी आणि वसुंधरा यांची आई विजयाराजे शिंदे या भाजपच्या संस्थापकांपैकी एक आहेत. छत्तीसगढमध्ये भाजपने पक्षाकडे गेल्या पाच वर्षात दुर्लक्ष केल्याने येत्या निवडणुकीत काँग्रेसला तो सत्तेतून हटवेल अशी शक्यता दिसत नाही. निवडणूक पाहणारे काँग्रेसलाच झुकते माप देताना दिसतात. माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांना पक्षाने तिकीट दिले असले तरी त्यांना ‘कंडम’ फाईलमध्येच टाकलेले आहे. तेलंगणात भाजपने चांगले काम करत असलेला प्रदेशाध्यक्ष बदलून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. त्यातच कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसच्या शिडात वारे भरले आहे त्याने सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हैराण झाली आहे. गेली दहा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या चंद्रशेखर राव यांच्याविरोधात अचानकपणे अँटी-इन्कबंसी वाढत आहे, असे दिसत आहे.
मोदींनी भाजपमधील जेष्ठ नेत्यांना अगोदरच ‘शांत’ केलेले आहे आता त्यांचा मोर्चा राज्यांकडे वळला आहे. पद्धतशीरपणे आपले लोक मोक्याच्या ठिकाणी बसवून पक्ष आणि राज्यातील सरकारांवर आपली पकड ठेवण्याची रणनीती कितपत सफल होईल ते पुढील काळात दिसणार आहे. येत्या निवडणुकात भाजपला प्रत्येक जागेसाठी निकराची लढाई करावी लागणार आहे. इंच-इंच लढवू, असाच प्रण दोन्ही बाजूंनी घेतल्याने लढाई हातघाईची होणार आहे. लढाई कोणाकरताच सोपी नाही. निवडणूक चाचण्यांत छत्तीसगढ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची चलती दिसत आहे तर राजस्थानमध्ये भाजपला थोडी बढत. तेलंगणामध्ये भाजप तिसऱ्या स्थानावर असे दाखवले जात आहे. अशावेळी या निवडणूकांत नवीन खेळ मांडल्याने मोदींचीच कसोटी आहे. अलीकडील निवडणुकात लोक स्पष्ट बहुमत देऊन सत्ता देतात ते कर्नाटक, हिमाचल आणि गुजरातमध्ये दिसले आहे. कर्नाटकमध्ये भाजपची मोहीम कशी जबर फसली कळलेही नाही. अशा वेळेस मोदींची जादू राज्यात किती चालणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
सुनील गाताडे








