5 सप्टेंबरला मतदान, 8 रोजी मतमोजणी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या सहा राज्यांच्या सात विधानसभांच्या पोटनिवडणुका 5 सप्टेंबरला होणार आहेत. तर मतमोजणी 8 सप्टेंबरला केली जाणार आहे. 10 ऑगस्टला अधिसूचना जारी केली जाणार असून 17 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
झारखंडमधील डुमरी विधानसभा जागा जगरनाथ महतो यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. त्याचप्रमाणे केरळमधील पुथुपल्ली विधानसभा जागा ओमन चंडी, त्रिपुराच्या बॉक्सानगरमधील समसुल हक, पश्चिम बंगालमधील धुपगुरी (एससी) विधानसभा मतदारसंघातील बिष्णू पांडे आणि उत्तराखंडमधील बागेश्वर (एससी) विधानसभा जागा चंदन राम दास यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. तसेच प्रतिमा भीमिक यांच्या राजीनाम्यामुळे त्रिपुरातील धनपूर विधानसभेची आणखी एक जागा रिक्त झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा जागा दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती. या एकंदर सात जागांवर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.









