वृत्तसंस्था/क्वीटो
इक्वेडोरमधील अध्यक्षीय पदाचे उमेदवार फर्नांडो विलाविसेंशियो यांच्यावर एका मागोमाग एक अशा तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. फर्नांडो हे प्रचार सभेनंतर कारमध्ये बसत असताना हा हल्ला झाला आहे. फर्नांडो यांच्या हत्येची पुष्टी करत इक्वेडोरचे अध्यक्ष गुइलेम लासो यांनी आरोपींना मोकळे सोडले जाणार नसल्याचे म्हटले आहे. 59 वर्षीय पत्रकार विलाविसेंशियो हे 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतील 8 उमेदवारांपैकी एक होते. या हल्ल्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांसमवेत 9 जण जखमी झाले आहेत. फर्नांडो यांना दीर्घकाळापासून जीवे मारण्याची धमकी मिळत होती, असे त्यांच्या प्रचार व्यवस्थापकाने सांगितले आहे. तर हल्लेखोराने लोकांच्या दिशेने ग्रेनेड फेकला होता, परंतु सुदैवाने त्याचा स्फोट झाला नव्हता असे समोर आले आहे. हल्लेखोराचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इक्वेडोरमधील वाढती हिंसा अन् अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत, असे आवाहन फर्नांडो यांचे प्रचार व्यवस्थापक जुकियालांड यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांना केले आहे.फर्नांडो हे इक्वेडोरचे माजी अध्यक्ष राफेल कोर्रिया यांचे कठोर टीकाकार राहिले आहेत. याकरता त्यांना 18 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. तसेच देशाबाहेर आश्रय घ्यावा लागला होता.









