लंडन / वृत्तसंस्था
काही वर्षांपूर्वी जगात खळबळ माजविणाऱया ‘विकिलिक्स’चा संस्थापक आणि शोधपत्रकार ज्युलियन ऍसँज याचे प्रत्यार्पण अमेरिकेला करण्यात येणार आहे. सध्या ऍसँज ब्रिटनमध्ये कारागृहात असून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेने केली होती. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी शुक्रवारी प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याने त्याला अमेरिकेच्या आधीन केले जाणार हे स्पष्ट झाले आहे.
ऍसँज यांच्या विकिलिक्सने काही वर्षांपूर्वी जगभरातील अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकाऱयांचे गुप्त आणि बेकायदेशीर आर्थिक व इतर व्यवहार उजेडात आणले होते. त्यामुळे त्याचे कौतुकही होत होते. तथापि, त्याने काही अतिसंवेदनशील जागतिक शांतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण कागदपत्रेही बाहेर आणल्याने सुरक्षेसंबंधी बाबी धोक्यात आल्या होत्या. इराक आणि अफगाणिस्तान येथील अमेरिकेच्या कारवाईसंदर्भातील गोपनीय कागदपत्रे त्याने उघड केली होती. हा गोपनीयता कायद्याचा भंग असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
ऍसँजच्या प्रत्यार्पणाची मागणी अनेक देशांनी केली होती. तथापि, चौकशीच्या निमित्ताने त्याचा छळ केला जाईल, अशी शक्यता असल्याने ब्रिटनने आजवर ही मागणी अमान्य केली. तथापि, त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास ब्रिटनमधील न्यायालयाने मान्यता दिल्याने प्रत्यार्पणाचा निर्णय घेण्यात आला.
विरोध करणार ऍसँजच्या अमेरिकेला होणाऱया प्रत्यार्पणाला विरोध करण्याचा निर्णय त्याच्या समर्थक संघटनांनी घेतला आहे. ब्रिटनच्या या निर्णयाविरोधात आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. प्रत्यार्पणाचा निर्णय अन्यायकारक असून त्यामुळे शोध पत्रकारिता ही संकल्पनाच धोक्यात येऊ शकते, असे समर्थकांचे म्हणणे आहे. जे गैरप्रकार त्याने बाहेर काढले त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मात्र, विविध देशांची सरकारे त्यासंदर्भात दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही होत आहे.









