वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) अध्यक्ष रिपुन बोरा यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिला. रिपुन बोरा यांनी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना राजीनामापत्र पाठवून दिले आहे. या पत्रात त्यांनी पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आसाममध्ये टीएमसी स्वीकार्य बनवण्यासाठी अनेक सूचना दिल्या होत्या, परंतु त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गेल्या दीड वर्षांपासून मी ममतादीदींना भेटू शकलो नाही, याचे शल्यही सातत्याने जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईशान्येकडील राज्यातील लोक टीएमसीला पश्चिम बंगालचा ‘प्रादेशिक पक्ष’ मानतात आणि ते आपला पक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.









