वृत्तसंस्था/ ईटानगर
अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यात आसाम रायफल्सने त्वरित आणि समन्वित अभियान राबवून एनएससीएन-के (रिबेल)च्या कब्जात असलेल्या दोन मजुरांची मुक्तता करविली आहे. ही घटना दादम सर्कलच्या लाहो गावात घडली असून तेथे उग्रवाद्यांना निर्माण स्थळावरून दोन मजुरांचे अपहरण केले होते. गुप्तचरांकडून माहिती मिळताच आसाम रायफल्सच्या तुकड्या त्वरित सक्रीय झाल्या आणि नीयानू क्षेत्रात एक शोध आणि बचाव मोहीम सुरु करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने बेछूट गोळीबार सुरु केला, ज्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. नियंत्रित आणि अचूक प्रतिक्रियेमुळे दोन्ही मजुरांना कुठल्याही ईजेशिवाय मुक्त करविण्यात आले. या दोन्ही मजुरांना वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक सहाय्यासाठी खोंसा लाया येथे आणले जात आहे. क्षेत्रात शोधमोहीम अद्याप सुरू असून पसार झालेल्या उग्रवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले आहे.









