नगरसेवक सदानंद नाईकही शर्यतीत : ज्येष्ठ असल्याने भाजप गट सत्तेत आल्यास दावा करणार
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे नगराध्यक्षपद लिंडन पेरेरा यांचा राजीनामा ग्राहय़ धरण्यात आल्याने रिक्त झाले असून या पदासाठी इच्छुकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. 9 सदस्यीय भाजप गटातील ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांनी आपणही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आमच्याकडे सध्या 9 सदस्य असून मडगाव पालिकेत आमचा गट सर्वांत मोठा आहे. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या सत्तेतील युतीकडे 15 सदस्य, तर नगरसेवक घनश्याम शिरोडकर हे काँग्रेसकडून फारकत घेतल्यापासून स्वतंत्र आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष काय निर्णय घेतो त्याचे आम्ही पालन करणार. मात्र मडगावचे आमदार दिगंबर कामत भाजपात प्रवेश करणार असे सांगितले जात असून तसे घडल्यास कामत गटातील 7 व आम्ही 9 मिळून 16 सदस्यीय गट बनेल. तशा परिस्थितीत मी चार वेळा निवडून आलेलो असल्याने व ज्येष्ठ नगरसेवक असल्यामुळे माझा नगराध्यक्षपदावर दावा राहील, असे नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे, कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास घनश्याम शिरोडकर हे फातोर्डा फॉरवर्ड गटाच्या संपर्कात येऊन त्यांच्या 8 नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करण्याची व त्या परिस्थितीत नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊन घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्वी झालेल्या समझोत्यानुसार, लिंडन पेरेरा यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदावर आता मॉडेल मडगाव या आमदार दिगंबर कामत गटातील नगरसेवकाची नगराध्यक्ष म्हणून वर्णी लागणार आहे. मात्र सदर पदासाठी या गटात नगरसेवक दामोदर शिरोडकर यांच्यासह नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक असे दोन दावेदार असल्याने आमदार कामत यांची उमेदवार निवडताना कसोटी लागणार आहे. सध्या कामत यांच्या गटाकडे 7, तर सरदेसाई यांच्या गटाकडे 8 असे मिळून एकूण 15 सदस्यांचे संख्याबळ आहे व आवश्यक जादुई आकडा 13 पेक्षा ते जास्त आहे. त्यामुळे हे दोन्ही गट एकसंध राहिल्यास विरोधकांना कोणतीही संधी राहणार नाही. मात्र कामत हे भाजपाच्या संपर्कात असल्याच्या वावडय़ा वरचेवर उठत असल्याने या समीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे, विरोधी बाकांवर भाजपकडे 9 नगरसेवक आहेत, तर घनश्याम शिरोडकर यांनी कामत गटाशी फारकत घेऊन कोणाशीही जवळीक न साधल्याने ते सध्या स्वतंत्र नगरसेवक बनले आहेत. भाजप गटाकडे सुरुवातीस निवडून आलेले 7 व नंतर फातोर्डा फॉरवर्ड सोडून त्यांना येऊन मिळालेल्या नगरसेविका स्वेता लोटलीकर आणि स्वतंत्र नगरसेवक महेश आमोणकर यांच्या समावेशाने 9 नगरसेवकांचे संख्याबळ झाले आहे व तो पालिकेतील सर्वांत मोठा गट बनला आहे. भाजप गटाला पालिकेवर सत्ता मिळवायची झाल्यास त्यांना आणखी 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे.









