पूर्वसूचना न देता दिवसाढवळ्या बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद : बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
बेळगाव : कपिलेश्वर उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले तरी कोणतीही पूर्वसूचना न देता उड्डाणपूल बंद करण्यात आल्याने वाहतुकीचे तीनतेरा झाले. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. विशेषत: धारवाड रोड उड्डाणपुलावर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. रस्ता करण्यापूर्वी पूर्वसूचना दिली असती तर वाहनचालकांची गर्दी झाली नसती.
उड्डाणपुलाचे यापूर्वीचे डांबरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो वेळी करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. मागीलवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या खडीमुळे मोठे अपघात घडले. सर्व थरातून टीका झाल्यानंतर उड्डाणपुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मागील दोन दिवसांपासून डांबरीकरणासाठी उड्डाणपुलाची स्वच्छता करण्यात येत होती. रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असताना डांबरीकरण केले जाईल, असे सांगण्यात आले होते.
बुधवारी सकाळीच उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे नोकरी, व्यवसायाला जाणाऱ्या नागरिकांना कपिलेश्वर उड्डाणपुलाखालून थेट जुना धारवाड रोड येथील उड्डाणपूल गाठावा लागला. आधीच तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद केल्याने जुन्या धारवाड रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. अशातच बुधवारी कपिलेश्वर उड्डाणपूल बंद असल्याने या पुलाची वाहतूकदेखील धारवाड रोडवर वळविण्यात आली. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. फोर्ट रोडवर पडलेल्या खड्ड्यांमधून वाहनांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागली.
नोकरदार झाले हैराण
सकाळी कामावर पोहोचण्यासाठी नोकरदारांची धावपळ सुरू होती. परंतु, उड्डाणपूल बंद असल्याने पर्यायी मार्गाने ये-जा करावी लागली. आधीच काही रेल्वेगेट बंद करण्यात आल्याने उड्डाणपुलांवर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे बराचकाळ नागरिकांना वाहतूक केंडीत अडकावे लागले. त्यामुळे बरेच नोकरदार बुधवारी वेळेवर कामावर पोहोचू शकले नाहीत. तसेच शाळांचे निकाल होते तरी विद्यार्थी व पालक वेळेत पोहोचू शकले नाहीत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला जाब…
कोणतीही पूर्वसूचना न देता उड्डाणपूल बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता करणाऱ्या कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. सुनील बाळेकुंद्री यांनी संबंधितांना जाब विचारत हे काम रात्रीचे होणार होते, दिवसा का केले? अशी विचारणा केली. त्यावेळी आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली असल्याने आम्ही काम सुरू ठेवत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.









