900 मीटर रस्त्यासाठी 85 लाखांचा निधी मंजूर
बेळगाव : हिंडलगा रोड येथील गांधी स्मारक ते मिलिटरी गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले होते. अनेक अपघात होत असल्याने लवकर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात होती. आमदार असीफ सेठ यांच्या निधीतून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव शहराला हिंडलगा व कोकणाशी जोडण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असलेल्या वेंगुर्ला रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. यामध्ये अरगन तलावाच्या शेजारील रस्त्यावर अनेक खड्ड्यांमुळे वरचेवर अपघात होत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठे आंदोलन करून या रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधून घेतले होते. या सर्वाची दखल घेत आमदार असीफ शेठ यांनी विशेष निधी मंजूर करत 900 मीटर रस्त्यासाठी 85 लाख रुपयांचा निधी दिला.
गांधी स्मारकापासून हिंडलगा गणपतीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या एका बाजूचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम येत्या चार दिवसात पूर्ण केले जाणार आहे. सध्या रुंदीकरण न करता आहे तितक्याच रुंदीचा रस्ता केला जात आहे. किमान खड्ड्यांमधून दिलासा मिळाल्याने वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत.









