उर्वरित रणकुंडये पर्यंतचा रस्ता दोन महिन्यात होणार पूर्ण : चोर्ला पर्यंतच्या रस्त्याचेही डांबरीकरण लवकरच
वार्ताहर/कणकुंबी
कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जोमाने सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात कुसमळी ते चोर्ला पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत कुसमळी ते रणकुंडये पर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रणकुंडये ते चोर्ला पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. सदर रस्त्याचे दोनवेळा डांबरीकरण म्हणजे डबल कोटींग करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. सदर रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 ए. ए. बेळगाव विभागांतर्गत येत असून, त्यानुसार रणकुंडयेपासून चोर्ला पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणापैकी सध्या कुसमळी ते कणकुंबी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. एकंदरीत दोन टप्प्यांत रणकुंडये ते चोर्ला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
रस्त्यासाठी अंदाजे 58.90 कोटी रुपयांची निविदा
राष्ट्रीय महामार्ग 748 ए. ए. हा रस्ता बेळगाव विभागांतर्गत येत असून, राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यावतीने निविदा मागवल्या होत्या. रस्त्यासाठी अंदाजे 58.90 कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार 35.30 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
डांबरीकरणाच्या निधीतूनच नदीवर नवीन पूल बांधण्याच्या हालचाली
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने तो धोकादायक बनला होता. त्यामुळे नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती. नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर नसून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीतूनच मलप्रभा नदीवरील पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पूल 90 मिटर लांब तर साडेपाच मिटर रुंद होणार आहे. सध्या नदीत मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. जुना पूल काढण्यात आलेला असून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. ब्रिटिश कालीन पुलाला सव्वाशे वर्षाचा इतिहास होता.
पर्यावरण प्रेमीं, वनखात्याची रस्ता रुंदीकरणात आडकाठी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चोर्ला रस्त्यावरील वाहतुकीचा ताण ओळखून रस्त्याचे दुपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु पर्यावरण प्रेमींनी आणि वनखात्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आडकाठी घातल्याने सदर रस्त्याचे काम थांबले. राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागांतर्गत बेळगाव विभागीय राष्ट्रीय महामार्गाच्या सीपीसी मोडवर चोर्ला रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या रस्त्यामुळे बेळगाव आणि गोवा अशी इंधन आणि वेळेची बचत करणारा रस्ता आहे. गेल्या पाच सहा वर्षापासून या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. आता डांबरीकरणामुळे पुन्हा एकदा वाहनांचा वेग वाढणार असून, धोकादायक वळणे घातक ठरणार आहेत.
अवजड वाहतूक बंदीचा आदेश धाब्यावर
रस्ता व नूतन पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने बेळगाव, चोर्ला, गोवा अशी आंतरराज्य अवजड वाहतूक बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. या मार्गावरून रात्रंदिवस होणारी अवजड वाहतूक रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण अवजड वाहतूक पावसाळ्dयापर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. परंतु पोलिसांच्या कृपाशीर्वादाने अवजड वाहतूक बंदीचा आदेश धाब्यावर बसवून अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.









