कोल्हापूर :
कोल्हापूर शहरालगत विस्तारलेल्या उपनगरांना जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या कळंबा रिंगरोडच्या डांबरीकरणाचे काम सध्या थांबले आहे. जुना कळंबा नाका ते साळोखेनगर पाण्याच्या टाकीपर्यंतच रस्त्याची दुरुस्ती झाली आहे. निधी उपलब्ध झाला नसल्याने उर्वरीत रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. रस्ता पूर्णत: खड्ड्यात हरवल्याने हा रस्ता सध्या वाहनधारकांना डर्ट ट्रेकची अनुभुती देत आहे. खड्डेमय प्रवास अन् मोठयाप्रमाणात पसरणाऱ्या धुळीचा त्रास वाहनधारकांसह परिसरतील नागरिक, व्यवसायिक यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कळंबा रिंगरोडलगत सध्या मोठयाप्रमाणात उपनगरे विस्तारली आहेत. त्यामुळे या रोडवर आता वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच कोल्हापूर–गारगोटी आणि कोल्हापूर–राधानगरी या राज्यमार्गाना जोडणारा हा रिंगरोड असल्याने अवजड वाहनांचीही मोठ्यासंख्येने या रोडवरुन ये–जा सुरु असते. मात्र सद्यस्थितीत खड्डेमय बनलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करणे मुश्कील बनले आहे. खड्डे, बारीक खर, धुळीचे लोट यामुळे वरचेवर येथे छोटे–मोठे अपघातही घडत आहेत.
- खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
कळंबा रिंगरोडवर मोठमोठे खड्डे असल्याने अनेक वेळा वाहनधारकांना प्रवासा दरम्यान कसरत करावी लागते. तसेच खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अनेक शारीरिक व्याधींनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
- धुळीचे लोट, आजाराला निमंत्रण
रस्त्यावर बारीक खर निर्माण झाली आहे. त्यामुळे एखादे चारचाकी अथवा अवजड वाहन गेल्यास येथे मोठ्याप्रमाणात धुळीचे लोट निर्माण होतात. त्यामुळे रस्त्यालगत राहणारे नागरिक, व्यवसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे आजाराला निमंत्रण मिळत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- रस्ता हरवला काळोखात
कळंबा रिंगरोडवर यापुर्वी रस्त्याच्या रुंदीच्या तुलनेत कमी प्रकाशाचे विद्युत दिवे बसविले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अगोरच हा रस्ता मंद प्रकाशझोतात सुरु होता. आता रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी हा रस्ता काळोखात हरवत आहे. अंधारात खड्डे दिसत नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
- विद्युत खांब धोकादायक स्थितीत
साळोखे नगर पाण्याच्या टाकीजवळ एक विद्यतु खांब धोकादायक स्थितीत आहे. हा विद्यतु खांब एका बाजूला झुकल्यामुळे तो पडण्याची भिती वाहनधारकांमध्ये आहे. विद्युत खांब बदलण्याबाबत वारंवार मागणी करुनही दूर्लक्ष होत आहे.
- निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीस सुरवात
कळंबा रिंगरोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्याबाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. सुमारे 900 मीटर रस्त्याचे डांबरीकरण बाकी असून यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये निधी आवश्यक आहे. 31 मार्चनंतर निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरीत रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण केले जाणार आहे.
– महादेव फुलारी, उपशहर अभियंता.








