3 कि. मी. रस्त्याचे काम सात महिन्यांपासून : त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी
वार्ताहर /धामणे
बस्तवाड (ह.) ते धामणे हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे या रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न बस्तवाड व धामणे आणि परिसरातील गावातील नागरिकांना लागून राहिला आहे.
बस्तवाड ते धामणे तीन किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यांपासून सुरू असून रस्त्याचे रुंदीकरण करून भराव घालण्यासह खडीकरण करण्यात आले आहे. आता डांबरीकरणाचे काम बाकी आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे ही खडी उखडली जाऊन रस्त्यावर पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. आता पावसाळय़ाला सुरुवात होणार असल्याने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळय़ात या रस्त्याचे केलेले खडीकरणाचे काम वाया जाणार आहे.
बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम मंजूर केले होते. त्यानंतर खासदार मंगला अंगडी यांनी तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती.
रहदारीचा रस्ता
बस्तवाड ते धामणे हा रस्ता पुढे अवचारहट्टी, येळ्ळूरमार्गे सुळगा, देसूर, खानापूर रोडला जोडला असल्याने हा रस्ता वाहनधारकांना सोयीस्कर आहे. या रस्त्यावर छोटय़ा-मोठय़ा वाहनांची मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. तरी या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









