मात्र रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याने धोका कायम : वाहतूक बंद करणे गरजेचे : ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वेस्थानकानजीक भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी जवळपास तीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. खोदलेल्या जागी मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने खानापूर, असोगा रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच कंत्राटदाराने खचलेल्या रस्त्याच्या डागडुजीसाठी दगड आणि खडी घालून भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र रस्ता खचण्यास सुरुवात झाली असून अगदी थोडाच रस्ता शिल्लक राहिल्याने सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खचण्याचा धोका असून या रस्त्यावरील वाहतूक बंद करणेच गरजेचे आहे.
त्यामुळे असोगा रस्त्याची वाहतूक या रस्त्यावरुन बंद होण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराने गेल्या दोन महिन्यापासून रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी रेल्वेस्थानकाच्या जवळून जाणाऱ्या असोगा रस्त्याला लागून भुयारी मार्गासाठी खोदकाम करण्यात आले आहे. पावसामुळे खोदकाम पेलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. असोगा मार्गावर ज्या ठिकाणी खोदकाम केलेले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडेही जमीन खचल्याने कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत.
पाण्याच्या धोक्यामुळे रस्ता खचण्यास सुरूवात
कंत्राटदाराने कोणतीच खबरदारी न घेता हे काम हाती घेऊन या ठिकाणी खोदकाम केल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने मोठ्या तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. पाण्याच्या धोक्यामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कंत्राटदाराने बुधवारी सकाळी या ठिकाणी मोठे बोर्डर आणि खडी टाकून रस्त्याच्या बाजूने भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रस्ता खचल्याने अगदी अरुंद रस्ता शिल्लक राहिला आहे. हा रस्ता केव्हाही खचू शकतो. यासाठी या रस्त्यावरील वाहतूक तातडीने बंद करणे गरजेचे आहे.
काम सुरू केल्यापासूनच कंत्राटदाराची अरेरावी
खानापूर भाजपचे कार्यकर्ते रेल्वे सल्लागार मंडळावर नेमण्यात आलेले आहेत. या सल्लागारानी कंत्राटदारांची बैठक घेऊन कामाबाबत सूचना करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराशी सल्लागारानी अद्यापही कोणतीही चर्चा केली नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदाराने काम सुरू केल्यापासूनच अरेरावीची भूमिका घेतली होती. कामासंदर्भात कुणालाच काहीही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. सकाळी पत्रकारानाही या ठिकाणी फोटो काढण्यास अथवा शुटींग करण्यास मज्जाव करण्यात येत होता. पत्रकारावरच अरेरावीची भाषा कंत्राटदाराचे कर्मचारी वापरत होते. त्यामुळे सल्लागार आणि कंत्राटदार यांच्यात कोणतीच चर्चा होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर, आणि खासदार विश्वेश्वेर हेगडे यांनी तातडीने याबाबत लक्ष घालणे गरजेचे आहे.









