वार्ताहर/थिवी
अस्नोडा येथे बुलेट मोटारसायकलची संरक्षक भिंतीला धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात अस्नोडा ग्रामपंचायतीचे पंच सदस्य मिलेश नाईक (वय 48) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी पंच सदस्य मिलेश नाईक हे थिवी येथून आपल्या घरी अस्नोडा येथे जात होते. तेव्हा त्यांना ह्य्दयविकाराचा झटका आला आणि त्यांचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या संरक्षक भिंतीला ते आदळले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दत्तप्रसाद राणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.









