स्वप्निल जाधवना उत्कृष्ट खेळाडू, योगेशकुमारना सर्वाधिक ब्रेकपॉईंटचा पुरस्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा स्नूकर संघटना आयोजित अस्मिता एन्टरप्रायझेस पुरस्कृत अस्मिता चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेत दावणगेरेच्या योगेशकुमारने हुबळीच्या ऍल्ड्रीन मोजेसचा 3-0 असा पराभव करून अस्मिता चषकासह रोख 15 हजार रूपयाचे बक्षीस पटकाविले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू स्वप्निल जाधव बेळगाव तर सर्वाधिक ब्रेकपॉईंट पुरस्कार योगेशकुमार यांना मिळाला.
दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील बेळगाव जिल्हा स्नूकर संघटनेच्या स्नूकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नूकर स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दावणगेरेच्या योगेशकुमारने बेळगावच्या स्वप्निल जाधवचा 2-0 तर दुसऱया उपांत्य सामन्यात ऍल्ड्रीन मोजेस हुबळी याने धारवाडच्या शोएब गदगचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत योगेशकुमारने ऍल्ड्रीन मोजेसचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते राजेश लोहार, टिळकवाडी पोलीसस्थानकाचे फौजदार चिन्नास्वामी व्ही., वसंत सोनलकर, अतित बेलेकर, सुनील पवार, जयश्री काशिद, महादेव काशिद आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या योगेशकुमारला 15 हजार रूपये रोख, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, उपविजेत्या ऍल्ड्रीन मोजेसला 7 हजार रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या स्वप्निल जाधव व शोएब गदग यांना 1500 रूपये रोख व चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वप्निल जाधव तर सर्वाधिक 60 गुणांचा ब्रेकपॉईंट नोंदवणाऱया योगेशकुमारला खास चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून ए. कदम, आसिब मुल्ला, इम्रान अंकलगी, महंमद शहानवाज तरकार, साईराज काशिद, शब्बीर, डॉ. मन्सुर इनामदार यांनी काम पाहिले.









