वृत्तसंस्था /बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 2024 च्या थायलंड मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू अस्मिता छलियाचे एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. थायलंडच्या सुपिंदा कॅटेथाँगने छलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. शनिवारी येथे झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात थायलंडच्या सुपिंदा कॅटेथाँगने अस्मिता छलियाचा 21-13, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताची 24 वर्षीय छलियाने या सामन्यात दर्जेदार खेळ केला पण थायलंडच्या अनुभवी सुपिंदाने तिची घोडदौड रोखली. कॅटेथाँगने हा सामने 35 मिनिटात जिंकला. अस्मिताने विश्व बॅडमिंटन टूरवरील आंतराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला. अस्मिता छलियाच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील एकूण आव्हान संपुष्टात आले आहे.









