पुढचे तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
प्रतिनिधी / पुणे /मुंबई
राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला असून, बहुतांश भागात शनिवारपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा पुढील तीन दिवस देण्यात आला आहे, तर रविवारी रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात अती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे आधीच गाळात ऊतलेल्या राज्याच्या संकटात भर पडणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, ते शनिवारी दक्षिण ओरिसा ते उत्तर आंध्र किनारपट्टी पार करीत पश्चिमेकडे प्रवास करणार आहे. या भागातून येणाऱ्या वाऱ्यात वाढ झाल्याने राज्यातदेखील पावसाचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा दाब वाढला आहे.
राज्याच्या अनेक भागात शुक्रवार दुपारपासूनच पावसाने वेग घेतला आहे. पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही जिह्यात पावसाची तीव्रता अधिक असून, या भागात वाऱ्याचा वेगदेखील जास्त आहे.
पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट
राज्याच्या अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात शनिवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट, नांदेड, लातूर, धाराशिव यांचा समावेश आहे.
समुद्रात न जाण्याचा इशारा
30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 50 ते 65 किमी वेगाने वारा वाहणार असल्याने सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.
परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर
परतीचा मान्सून शुक्रवारी संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीरचा काही भाग उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघारी फिरला आहे. गुजरातच्या बहुतांश भागातूनदेखील पाऊस परतला असून, सध्या तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहचला आहे.
राज्यात 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस
पुढील दोन आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला असून, राज्यात 2 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात 92 लाख एकरवरील शेतीचे नुकसान : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक संकटामुळे राज्यात 92 लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यात 53 लाख 38 हजार एकर शेतीचे नुकसान एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना लवकरच चांगली मदत केली जाईल, असे आश्वासनही दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्यवेळी यावर निर्णय घेतील, असे भरणे यांनी स्पष्ट केले. सध्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासोबतच नदी आणि ओढ्यांवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणाचा मुद्दाही समजून घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्याचे कौतुक केले. ही बँक सहकार क्षेत्रात भारतातील सर्वात मोठी बँक असून, 1996 सालापासून आपण बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहोत. या बँकेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना नेहमीच मदत केली जाते, असे त्यांनी सांगितले.
काही भागात अतिवृष्टीचा अंदाज, सरकारही अलर्ट मोडवर
पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे 27 किंवा 28 सप्टेंबर या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात अतिवृष्टी होऊ शकते. सरकारही अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी जी काही सतर्कता त्यादृष्टीने घेता येईल, त्यांच्या परिने ती त्यांनी घ्यायला हवी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.








