ऑनलाईन ऑर्डरनंतरचा धक्कादायक प्रकार
आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून अनेकदा वस्तू मागवत असतो, परंतु मागविलेल्या वस्तूच्या बदल्यात भलतीच वस्तू मिळत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला आहे. या व्यक्तीच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये एक बॉम्बच मिळाला आहे. या व्यक्तीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मोबाइल मागविला होता. हा व्यक्ती गुआनजुआतोच्या लियोन येथे राहणारा आहे.

या व्यक्तीचे पार्सल सोमवारी प्राप्त झाले होते, त्याच्या आईने हे पार्सल स्वीकारून ते किचन टेबलवर ठेवले होते. या पार्सलमध्ये नेमके काय आहे याची कल्पना तिला नव्हती. नंतर हे पार्सल उघडण्यात आल्यावर यात ग्रेनेड दिसून आला. संबंधित व्यक्तीने त्याची छायाचित्रे ऑनलाइन शेअर केली आहेत. तसेच त्याने संबंधित कंपनीशी संपर्क साधला. मग त्याच्या घरी बॉम्ब निष्क्रीय करणारे पथक पाठविण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घराभोवती बंदोबस्त ठेवला. सैन्याच्या पथकाने हा हँडग्रेनेड निष्क्रीय करण्यास यश मिळविले आहे. सध्या या पॅकेजसंबंधी चौकशी करण्यात येत आहे. पॅकेजमध्ये अखेर ग्रेनेड कसा आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हँडग्रेनेडवर मेक्सिकोत बंदी असली तरीही देशात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांमध्ये वारंवार संघर्षाचा भडका उडत असतो. एकमेकांचा नायनाट करण्यासाठी या टोळ्यांकडून बॉम्ब आणि अन्य स्फोटकांचा वापर केला जातो. मागील 6 वर्षांमध्ये पोलिसांनी केवळ गुआनाजुआतो येथूनच 600 हून अधिक स्फोटके जप्त केली आहेत.









