चव्हाट गल्ली मराठी शाळा क्रमांक 5 चे प्रकरण : माजी विद्यार्थी संघटनेचा लढा
बेळगाव : चव्हाट गल्ली, मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बालहक्क आयोगासमोर 2.30 वाजता सुनावणी होणार होती. मात्र अध्यक्षांनी 10 वाजताच सुनावणी सुरू करुन कोणी हजर नसल्याचे दाखविले होते. मात्र सदर अधिकाऱ्यांना अॅड. अमर येळ्ळूरकर व माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. आपली चूक कबुल करुन म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक 5 च्या मालमत्तेची बेकायदेशीर विक्री करण्यात आली आहे. त्या विरोधात शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच बालहक्क आयोगाकडेही 2021 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरुन बालहक्क आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 4 रोजी दुपारी 2.30 वाजता सुनावणी करण्यासाठी तक्रार दाखल केलेल्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार शाळेच्या बाजूने अॅड. अमर येळ्ळूरकर व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते. मात्र बालहक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच पूर्व सूचना न देता सकाळी 10 वाजताच सुनावणी करुन कोणीच हजर नसल्याचे दाखविले होते व सुनावणी लांबणीवर टाकली होती.
ही बाब समजताच अॅड. अमर येळ्ळूरकर व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर, एसडीएमसी अध्यक्ष अष्टेकर, अमृत जाधव, रवी नाईक, किसन रेडेकर यांनी आयोगाचे चेअरमन नागनगौडा व सदस्य मंजुनाथ आनंद यांची जिल्हा पंचायत कार्यालयात भेट घेवून सुनावणी पुढे ढकलल्याचा जाब विचारला. कोणतीच पूर्व सूचना न देता सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल शाळेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन पुढील सुनावणी करण्यात येईल, दोषींवर योग्यती कारवाई करु, असे सांगण्यात आले. शाळेच्या मालमत्तेची बेकायदेशीरपणे व्यवहार करण्यात आला आहे. याविरोधात चव्हाट गल्लीतील नागरिक व शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून न्यायालयात धाव घेऊन या व्यवहाराला स्थगिती आणली आहे. त्यामुळे बिरेश्वर सोसायटी व मोकाशी कुटुंबियांविरोधात न्यायालयात वाद सुरू आहे. याबरोबरच माजी विद्यार्थी संघटनेकडून बालहक्क आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती. शंभरी गाठलेल्या शाळेच्या मालमत्तेच्या गैरव्यवहार प्रकरणामुळे मुलांच्या शिक्षणावर गदा येणार आहे. यासाठी सदर तक्रार बालहक्क आयोगाकडेही करण्यात आली होती. यावरुन बालहक्क आयोगाकडून दि. 4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र यावर सुनावणी न करता पुढे ढकलण्यात आल्याने जाब विचारणे भाग पडले.
दुपारची सुनावणी सकाळी
न्यायालयाकडून नेहमीच वेळेचे पालन केले जाते. मात्र येथील चव्हाट गल्ली शाळेच्या जागेसंदर्भातील सुनावणीची वेळ 2.30 वाजता देण्यात आली होती. मात्र सकाळी 10 वाजताच प्रकरणाची सुनावणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामागचे गौंडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









