वृत्तसंस्था / अहमदाबाद
येथे रविवारपासून 11 व्या आशियाई जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत असून साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या दोन ऑलिम्पियन जलतरणपटूंच्या कामगिरीवर भारताची भिस्त राहील. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी 40 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी होत असून त्यामध्ये 20 महिला आणि 20 पुरूषांचा समावेश आहे.
येथील नारनपुरा परिसरात वीर सावरकर क्रीडा संकुल या स्पर्धेसाठी नव्याने बांधण्यात आले आहे. या संकुलामध्ये गेल्या महिन्याभराच्या कालावधीत भारतीय जलतरणपटूंसाठी सराव शिबिर आयोजित केले होते. आशियाई खंडातील ही महत्त्वाची जलतरण स्पर्धा असून यामध्ये 29 देशांचे सुमारे 1100 जलतरणपटू सहभागी होत आहेत. पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय जलतरणपटूंना सदर स्पर्धा पात्र फेरीची राहील. साजन प्रकाश, श्रीहरी नटराज, भव्या सचदेव, नीना व्यंकटेश, मानवी वर्मा, आशा चौधरी तसेच पुरूष विभागात एस. धनुष्य, शोहन गांगुली, जे. थॉमस, अनिश गौडा, अद्वीत पागे, विक्रम चेंगमाई, कुशाग्रह रावत, विनायक यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहील.









