पुढील वर्षी जानेवारीत आयोजन
वृत्तसंस्था/ कतार
आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील आवृत्ती पुढील वर्षी जानेवारी 10 ते फेब्रुवारी 10 या कालावधीत कतारमध्ये होणार असल्याचे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने (एएफसी) बुधवारी जाहीर केले.
दर चार वर्षांनी होणारी ही खंडीय स्पर्धा 2019 मध्ये चीनला बहाल करण्यात आली होती. पण चीनमध्ये कोविडने पुन्हा जोर धरला असल्याने त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क सोडून दिले. मागील वर्षी कतारमध्ये पुऊषांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते, हे लक्षात घेत त्यांना या आशियाई चषक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क देण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी दक्षिण कोरिया व इंडोनेशिया यांनीही अर्ज केले होते. पण कतारला प्राधान्य देण्यात आले.
यावर्षीच्या मध्यावर होणारी ही स्पर्धा आता 2024 च्या सुऊवातीला होणार आहे. गल्फ देशातील उष्ण तापमान टाळण्यासाठी ही स्पर्धा वर्षाच्या सुऊवातीलाच घेतली जाणार आहे. यात एकूण 24 संघ सहभागी होणार आहेत. कतारने यापूर्वी दोनदा 1988 व 2011 मध्ये आशियाई चषक स्पर्धा आयोजित केली होती. आणि 2019 मध्ये यूएईमध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत कतार संघानेच जेतेपद पटकावले होते. कतारमध्ये ही स्पर्धा आठ स्टेडियम्सवर घेतली जाणार असून त्यापैकी सहा स्टेडियम्सवर वर्ल्ड कपमधील सामने खेळविण्यात आले आहेत.









