वृत्तसंस्था / बँकॉक
आशियाई मुष्टीयुद्ध संघटनेतून (आयबीए) बाहेर पडण्याचे संकेत आशिया खंडातील अनेक देशांकडून मिळाल्याची माहिती आशिया मुष्टीयुद्ध कॉन्फडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.
बँकॉकमध्ये गुरुवारी आशियाई मुष्टीयुद्ध कॉन्फडरेशनच्या संचालकांची बैठक झाली. दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) आर्थिक तसेच वंशीक आणि कारभारातील समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना बडतर्फ करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला गेला होता. त्यामुळे आशिया खंडातील अनेक संघटनांना ऑलिंपिक मान्यतेपासून वगळण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी आयओसीकडून शिफारस करण्यात आली. तसेच आयओसीशी संलग्न असलेल्या फेडरेशनमध्ये दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 43 देशांच्या सदस्यांच्या संघटनेला आयओसीकडून एक लेखीपत्र पाठविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्यातील मतभेदामुळे चालू वर्षी होणारी आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 14 जुलै रोजी कझाकस्तानमध्ये होणारी युवा आणि कनिष्ठांची मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकाराचा समावेश आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी पात्रता फेरीच्या स्पर्धा आयबीएकडून घेतल्या जात नसून त्या आयओसीतर्फे होत आहेत.









