भारताचा आज चीनशी सलामीचा सामना, आशियाई खेळांच्या तयारीच्या दृष्टीने स्पर्धेला महत्त्व
वृत्तसंस्था/ चेन्नई
आशियाई चॅम्पियन्स चषक पुरुष हॉकी स्पर्धा आज गुऊवारपासून येथे सुरू होणार असून स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाणाऱ्या आणि तीन वेळा विजेते राहिलेल्या भारताला त्यांच्या आशियाई खेळांच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला भारत हा या स्पर्धेत उतरलेला सर्वोच्च क्रमांकाचा संघ आहे आणि येथील महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर चीनविऊद्धच्या सामन्याने ते त्यांच्या मोहिमेची सुऊवात करतील. 2007 नंतर प्रथमच मोठ्या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. 2011 मध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाल्यापासून भारताने आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतासाठी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझाऊ येथे होणार असलेल्या आशियाई खेळांच्या दृष्टीने खेळाडूंची चाचपणी करणे आणि आपल्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीची कल्पना देणे ही या स्पर्धेत उतरताना प्राथमिक उद्दिष्टे असतील. आशियाई खेळातून पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीचे थेट तिकीट उपलब्ध होणार असल्याने भारत विविध खेळाडूंची चाचपणी करून पाहेल असे दिसून येत आहे. त्याचबरोबर आशियाई खेळांपूर्वी खेळाडूंना ताजेतवाने आणि दुखापतींपासून मुक्त ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना समतोलही साधावा लागेल.

आशियाई खेळांच्या अवघ्या पाच आठवडे आधी ही स्पर्धा आयोजित केल्याने या वेळापत्रकावर पाहुण्यांच्या बाजूने काही टीका होत असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन मात्र या स्पर्धेत उतरावे लागत असल्याने फारसे नाराज झालेले दिसत नाहीत. ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला करावीच लागेल. पण आम्ही खेळण्याची गरज आहे. म्हणून आम्ही ते सामने खेळणे महत्त्वाचे आहे. ही स्पर्धा भारतात होत आहे हे आणखी चांगले आहे, असे फुल्टन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
जागतिक हॉकीचा विचार करता क्रमवारीतील स्थान आणि सन्मान या दोन्ही बाबतीत भारताला फायदा झाला असला, तरी टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्यांनी या वर्षाच्या सुऊवातीला भुवनेश्वर आणि रुरकेला येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी केली होती. विश्वचषकात भारतीय संघाला नवव्या स्थानावर राहावे लागले. पण तेव्हापासून हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ तब्बल 16 सामने खेळला असून त्यापैकी नऊ जिंकले आहेत, पाच गमावले आहेत आणि दोन बरोबरीत सोडविले आहेत.
भारतीय संघ युरोप दौऱ्यावरून थेट या स्पर्धेत उतरेल. त्यांचा स्पेनमधील शेवटचा सामना आणि चीनविऊद्धचा आजचा सामना यात केवळ तीन दिवसांचे अंतर आहे. या स्पर्धेत भारत ज्या क्षेत्राकडे सर्वाधिक लक्ष देणार आहे ते म्हणजे पेनल्टी कॉर्नरचे रूपांतरण. हरमनप्रीत, वऊण कुमार, अमित रोहिदास आणि जुगराज सिंग असे शक्तिशाली ड्रॅगफ्लिकर्स असूनही भारताला पेनल्टी कॉर्नर्सचे गोलात रूपांतर करण्यात येणारे अपयश हा अलीकडे चर्चेचा विषय बनला आहे. पहिल्या दिवशीच्या इतर सामन्यांमध्ये गतविजेत्या दक्षिण कोरियाचा सामना जपानशी होईल, तर पाकिस्तानचा सामना मलेशियाशी होईल.
आजचे सामने
1) कोरिया वि. जपान, दु. 4 वा.
2) मलेशिया वि. पाकिस्तान, सायं. 6.16 वा.
3) भारत वि. चीन, रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी, फॅनकोड.









