वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई विजेती आणि राष्ट्रीय विक्रमधारक 100 मीटर अडथळा शर्यत धावपटू ज्योती याराजीला काही दिवसांपूर्वी सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली असल्याने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक स्पर्धेच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
आशियाई खेळातील रौप्यपदक विजेत्या याराजीला सप्टेंबरमध्ये टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळण्याची शक्यता आहे. तथापि, अलीकडील दुखापतीमुळे त्या महत्त्वाकांक्षा भंग होऊ शकतात. ‘काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणादरम्यान माझ्या गुडघ्याला झालेल्या दुर्दैवी दुखापतीमुळे, मला माझा हंगाम थांबवावा लागला आहे’, असे ती म्हणाली. 12.78 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या याराजीने बुधवारी तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटली आहे की, माझ्या वैद्यकीय पथकासोबत माझे पर्याय तपासण्यासाठी आणि पुढील निर्णय घेण्यासाठी काम करत आहे, असे गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकनंतर दुखापतीमुळे या हंगामात परतलेल्या 25 वर्षीय याराजीने सांगितले. यावेळी तिचे प्रशिक्षक जेम्स हिलियर यांनी पीटीआयला सांगितले की, दुखापत खूपच वाईट आहे आणि त्यांवर आपण पर्याय शोधत आहोत. फेब्रुवारीमध्ये उत्तराखंड राष्ट्रीय खेळांमध्ये तिने 100 मीटर अडथळा आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद राखण्यापूर्वी फेडरेशन कपमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत तिने अव्वल स्थान पटकावले. तिने शेवटचे विजेतेपद 7 जून रोजी तैवान अॅथलेटिक्स ओपनमध्ये मिळविले होते.









