भारताचे नेतृत्व ज्योती येराजी, अविनाश साबळे,प्रवीण चित्रावेलकडे
वृत्तसंस्था / गुमी (द. कोरिया)
येथे 27 मे पासून सुरू होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व प्रामुख्याने अविनाश साबळे, ज्योती येराजी, प्रवीण चित्रावेल यांच्याकडे राहिल. मात्र या स्पर्धेत भारताचा भालाफेकधारक निरज चोप्रा सहभागी होणार नाही.
या स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली. कोचीमध्ये नुकत्याच झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेतील कामगिरीच्या आढावा घेत खेळाडूंची निवड करण्यात आली. भारताचे धावपटू राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे व पारुल चौधरी यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहिल. 16 मे पासून डायमंड लीग अॅथलेटिक्स सिरीजमधील पहिली स्पर्धा डोहा येथे होणार असल्याने निरज चोप्राने आशियाई अॅथलेटिक स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे बेंगळूरमध्ये 24 मे रोजी निरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जागतिक भालाफेकधारक सहभागी होत आहेत. त्यामुळे सचिन यादव आणि यशवीर सिंग हे भालाफेक प्रकारात आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. तसेच यापूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अनुराणी, तेजिंदरपाल सिंग तूर या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकर, तेजस्वीन शंकर, ज्योती येराजी, रुपल चौधरी यांच्याकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. बॅंकॉकमध्ये 2023 साली झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 12 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 27 पदकांची कमाई केली होती. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा द. कोरियात 27 ते 31 मे दरम्यान होणार आहे.









