भारतीय संघ / वृत्तसंस्था
चेन्नई
येथे 2023 च्या च्या आशियाई पुरुषांच्या हॉकी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता भारतीय पुरुष हॉकी संघाचे मंगळवारी येथील विमानतळावर आगमन झाले.
प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांच्या समवेत भारतीय संघातील हॉकीपटूंचे येथे मंगळवारी आगमन झाले. सदर स्पर्धा मायदेशी होत असल्याने भारतीय पुरुष हॉकी संघाकडून निश्चितच शौकिनांकडून अधिक अपेक्षा असल्याचे प्रशिक्षक फुल्टॉन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत यजमान भारत निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
आशिया हॉकी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली आहे. भारतीय पुरुष हॉक संघाने स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे पण या आगामी स्पर्धेत भारतीय संघावर अधिक दडपण राहिल. 25 जुलै रोजी हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी 18 जणांचा संघ जाहिर केला होता.
आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला प्राथमिक साखळी गटात कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीनबरोबर लढती द्याव्या लागतील. येत्या सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाला ही स्पर्धा सरावाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची राहणार आहे. हरमनप्रित सिंगकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून हार्दिक सिंग उपकर्णधार म्हणून राहिल. पी. आर. श्रीजेष आणि कृष्णनबहाद्दूर पाटक हे प्रमुख गोलरक्षक असून जर्मनप्रित सिंग, सुमित, जुगराजसिंग, हरमनप्रित सिंग, वरुणकुमार, अमित रोहिदास यांच्यावर बचावफळीची जबाबदारी राहिल. उपकर्णधार हार्दिक सिंग, विवेक सागरप्रसाद, समशेरसिंग, निलकांत शर्मा हे मध्यफळीत चोख कामगिरी बजावतील. आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, गुरुजंत सिंग, सुखजित सिंग आणि एस. कार्ति हे आघाडी फळीत खेळतील.
पाक हॉकी संघाचे भारतात आगमन
चेन्नईमध्ये गुरुवारपासून खेळवल्या जाणाऱ्या 2023 च्या आशिया चॅम्पियन्स हॉकी करंडक पुरुषांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक हॉकी संघाचे भारतात मंगळवारी आगमन झाले. पाक हॉकी संघाने अतारी वाघा सरहद्दीमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश केला. पुरुषांची हॉकी करंडक स्पर्धा 2011 पासून प्रत्येक वर्षी भरवली जाते. यामध्ये आशिया खंडातील अव्वल सहा संघांचा समावेश असतो. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतार्पंत भारत आणि पाकिस्तान हे दोन सर्वात यशस्वी म्हणून ओळखले जातात. 2018 साली झालेल्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. पाक संघाला मोहमद सक्लेन यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पाकचा संघ आता चेन्नईला रवाना होणार आहे. पाक हॉकी संघाचे नेतृत्व मोहमद उमर भुट्टाकडे सोपवण्यात आले आहे. सदर स्पर्धा 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. पाक हॉकी संघाने आतापर्यंत तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2012 साली पाकने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद तर त्यानंतर 2013 साली दुसऱ्यांदा आणि 2018 साली भारताबरोबर संयुक्त विजेतेपद पटकावले होते. भारतीय हॉकी संघाने 2011 साली सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारताने 2016 आणि 2018 साली ही स्पर्धा जिंकली आहे. 2021 साली या स्पर्धेचे विजेतेपद दक्षिण कोरियाने पटकावले होते.









