वृत्तसंस्था/ बेंगळूर
कनिष्ठ आशिया चषक जिंकून भारतात परतलेल्या भारतीय महिलांच्या कनिष्ठ हॉकी संघाचे मंगळवारी बेंगळूर विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. काकामिगाहारा, जपान येथे झालेली महिलांची कनिष्ठ आशिया चषक स्पर्धा भारताने पहिल्यांदाच जिंकली असून त्यांनी रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कोरियावर 2-1 ने मात केली.
भारतीय बचावपटू नीलमने अंमित सामन्यात महत्त्वपूर्ण गोलाची नोंद केली. तिने परतल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, आम्ही खूप आनंदित आहोत आणि मला संघाचा अभिमान वाटतो. आम्ही विश्वचषकासाठी पात्र झालो आहोत आणि आता आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. तेथेही आम्ही एखादे पदक मिळविण्याचा निश्चितच प्रयत्न करू, असे तिने सांगितले.
भारतीय कर्णधार प्रीतीने आता विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आम्ही विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो आहोत. आता आम्हाला केवळ पाठिंबा हवा आहे आणि तसा तो मिळाल्यास आम्ही निश्चितच विश्वचषक जिंकू. आमचे प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी खूप मदत करणारे असून त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे, असे प्रीतीने सांगितले.
भारताने यंदा चिलीमध्ये होणार असलेल्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले असून हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या या यशाबद्दल शाबासकी देताना प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपयांचे बक्षीस घोषित केलेले आहे, तर संघाबरोबरच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे इनाम मिळेल. संघाने केलेली अभूतपूर्व कामगिरी आणि एकही पराभव न स्वीकारता मिळविलेले स्पर्धेचे जेतेपद याची दखल घेऊन हे इनाम जाहीर करण्यात आले आहे.









