मेंडिस, समरविक्रमा असालंका यांची चमक, इफ्तिखारचे 3 बळी, रिझवान, शफिक यांची अर्धशतेक वाया
वृत्तसंस्था/ कोलंबो
2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत येथे झालेल्या सुपर फोर फेरीतील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या श्रीलंकेने पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत दोन गड्यांनी पराभव करून थरारक विजय मिळवला. या विजयामुळे लंकेने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून आता रविवारी भारत आणि लंका यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या पराभवामुळे पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. डकवर्थ-लेविस-स्टर्न नियमाच्या आधारे लंकेला 252 धावांचे आव्हान मिळाले होते. त्यांनी 8 गड्यांच्या मोबदल्यात हे उद्दिष्ट गाठले.

या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचानी प्रत्येकी 42 षटकांचा खेळ खेळवण्याचा निर्णय घेतला. पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. लंकेच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच शिस्तबद्ध आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पाकच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून चांगलेच रोखले. पाकतेर्फ सलामीचा अब्दुल्ला शफीक तसेच मोहम्मद रिझवान यांनी शानदार अर्धशतके झळकवली. इफ्तिखार अहमदने 2 षटकार आणि 4 चौकारासह 40 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमने 35 चेंडूत 3 चौकारासह 29 धावा जमवल्या. शफीकने 69 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 52 धावा झळकवल्या. रिझवानने शेवटपर्यंत खेळपट्टीवर रहात 73 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 86 धावा जमवल्याने पाकला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. 42 षटकात पाकने 7 बाद 252 धावा जमवत लंकेला 252 धावांचे आव्हान दिले. लंकेतर्फे पथिरानाने 65 धावात 3 तर मदुशनने 58 धावात 2 तसेच थीक्षना व वेलालगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात दुखापतीमुळे नसीम शहा आणि हॅरीस रौफ पाकतर्फे खेळू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजरीत पाकच्या गोलंदाजांनी तसेच क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त कामगिरी करत लंकेवर शेवटच्या षटकातही आपले दडपण ठेवले होते. लंकेच्या डावामध्ये चौथ्या षटकात सलामीचा कुसल परेरा एकेरी धाव घेण्याच्या नादात शदाफ खानच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने 8 चेंडूत 4 चौकारासह 17 धावा जमवल्या. निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 11 षटकात 57 धावांची भर घातली. शदाब खानने स्वत:च्याच गोलंदाजीवर निसांकाला टिपले. त्याने 44 चेंडूत 4 चौकारासह 29 धावा जमवल्या. निसांका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिस आणि समरविक्रमा यांनी संघाचा धावफलक सातत्याने हलता ठेवताना एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर दिला होता. या जोडीने तिसऱ्या गड्यासाटी शतकी भागीदारी केली. इफ्तिखार अहमदने समरविक्रमाला रिझवानकरवी यष्टीचित केले. त्याने 51 चेंडूत 4 चौकारासह 48 धावा जमवल्या. तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा कुसल मेंडिस शतकाकडे वाटचाल करत असताना इफ्तिकार अहमदने त्याला हॅरीसकरवी झेलबाद केले. कुसल मेडिसने 87 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 91 धावा जमवल्या. मेंडिस बाद झाला त्यावेळी लंकेला विजयासाठी आणखी 43 धावांची जरुरी होती आणि त्यांचे 6 गडी खेळावयाचे होते.
असालंकाने तळाच्या फलंदाजांच्या साथीने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. इफ्तिखारने कर्णधार शनाकाला 2 धावावर झेलबाद केले. त्यानंतर शाहिन आफ्रिदीने आपल्या दुसऱ्या हप्त्यातील गोलंदाजीत धनंजय डिसिल्वाला 5 धावावर वासिमककरवी झेलबाद केले. शाहिन आफ्रिदीने लंकेला आणखी एक धक्का देताना वेलालगेला खाते उघडण्यापूर्वी रिझवानकरवी झेलबाद केले. यानंतर प्रमोद मदेशन एका धावेवर धावचित झाला. लंकेची स्थिती यावेळी 41.4 षटकात 8 बाद 246 अशी होती. कुसल मेडिस बाद झाल्यानंतर लंकेने आपले आणखी चार फलंदाज 36 चेंडूत गमवले.
दरम्यान, डावातील शेवटच्या षटकात लंकेला विजयासाठी 8 धावांची जरुरी होती. असालंका आणि पथिराना ही जोडी मैदानात खेळत होती. असालंकाने शेवटच्या चेंडूवर विजयी दोन धावा घेत पाकचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. असालंकाने 47 चेंडुत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 49 धावा झळकवल्या. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. लंकेने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 9 षटकात 57 धावा जमवताना एक गडी गमवला. त्यांचे अर्धशतक 45 चेंडूत, शतक 103 चेंडूत, दीडशतक 153 चेंडूत तर द्विशतक 201 चेंडूत नोंदवले गेले. लंकेने तिसऱ्या पॉवर प्लेमध्ये 44 धावा जमवताना 5 गडी गमवले. पाकतर्फे आफ्रिदीने 52 धावात 2, इफ्तिखारने 50 धावात 3, शदाब खानने 55 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक 42 षटकांत 7 बाद 252 (शफिक 52, फखर झमान 4, बाबर आझम 29, रिझवान 86, मोहम्मद हॅरिस 3, नवाझ 12, इफ्तिखार 47, शदाब खान 3, शाहीन आफ्रिदी नाबाद 1, अवांतर 15, पथिराना 3-65, मदुशन 2-58, थीक्षना 1-42, वेलालगे 1-40). लंका 42 षटकात 8 बाद 252 (निसांका 29, कुसल परेरा 17, कुसल मेंडिस 91, समरविक्रमा 48, असालंका नाबाद 49, शनाका 2, धनंजय डिसिल्वा 5, वेलालगे 0, मदुशन 1, पथिराना नाबाद 0, अवांतर 10, इफ्तिखार अहमद 3-50, आफ्रिदी 2-52, शदाब खान 1-55).









