रोहित, गिलची नाबाद अर्धशतके : जडेजा, सिराजचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ कँडी
सामनावीर व कर्णधार रोहित शर्मा व त्याचा सलामीचा साथीदार शुभमन गिल यांनी नोंदवलेली नाबाद अर्धशतके आणि रवींद्र जडेजा व मोहम्मद सिराज यांची भेदक गोलंदाजी यांच्या आधारावर भारताने नेपाळचा 10 गड्यांनी पराभव करून आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये स्थान मिळविले.

नेपाळचा डाव 48.2 षटकांत 230 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने डकवर्थ-लेविस नियमानुसार 23 षटकांत 145 धावांचे सुधारित उद्दिष्ट मिळाल्यानंतर 20.1 षटकांत बिनबाद 147 धावा जमवित विजय साकार केला. या सामन्यात पावसाचा दोनदा व्यत्यय आला. नेपाळचा डाव सुरू असताना 38 व्या षटकावेळी पावसाचे आगमन झाले. एक तासाच्या ब्रेकनंतर खेळ सुरू झाला. त्यानंतर भारतीय डावात 2.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे 2 तासाचा मोठा ब्रेक घ्यावा लागला.
रोहित शर्माने 59 चेंडूत 6 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 74 तर गिलने 62 चेंडूत 8 चौकार, एक षटकारासह नाबाद 67 धावा फटकावल्या. या स्पर्धेत भारत, पाक व बांगलादेश यांचे सुपर फोरमधील स्थान निश्चित झाले आहे तर लंका किंवा अफगाण यापैकी एक यातील चौथा संघ असेल.
शेखचे अर्धशतक

आसिफ शेखचे अर्धशतक आणि सोमपाल कामी यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने भारताला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य दिले होते. रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे, नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला तर भारताकडूनही गचाळ क्षेत्ररक्षण झाले.
प्रारंभी, रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी कर ण्याचा निर्णय घेतला. पण नेपाळच्या फलंदाजांनी रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला चांगली सुरुवात करून दिली. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच निराशाजनक होते. श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी पहिल्या काही षटकांमध्ये 3 सोपे झेल सोडले. याचा फायदा घेत कुशल आणि आसिफ यांनी पहिल्या विकेटसाठी 65 धा
वांची भागीदारी केली. ही भागीदारी शार्दुल ठाकूरने मोडली. त्याने कुशलला यष्टिरक्षक इशानकरवी झेलबाद केले. कुशलला 25 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. यानंतर जडेजाने भीम शार्की (7), कर्णधार रोहित पौडेल (5) आणि कुशल मल्ला (2) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आसिफने गुलशन झासोबत 31 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, आसिफने आपले अर्धशतक पूर्ण केले. 8 चौकारांच्या मदतीने 97 चेंडूंत 58 धावा करून तो सिराजच्या हाती झेलबाद झाला. गुलशनलाही सिराजने यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर दीपेंद्र सिंग आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. हार्दिकने दीपेंद्रला 29 धावांवर बाद केले. दुसरीकडे सोमपालने मात्र शानदार खेळी साकारत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. सोमपाल 56 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा करून बाद झाला. संदीप लामिछाने 9 धावा करून धावबाद झाला. त्याचवेळी सिराजने ललित राजबंशीला बाद करत नेपाळचा डाव 48.2 षटकांत 230 धावांत गुंडाळला.
भारतीय गोलंदाजांची धुलाई
पहिल्यांदा आशिया चषक खेळण्याची संधी मिळालेल्या नेपाळ संघाची फलंदाजी समाधानकारक राहिली. या सामन्यात नेपाळचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना आव्हान देताना दिसले. भारतीय संघासाठी रवीद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पण ते बरेच महागडे ठरले. सिराजने 9.2 षटकात 61, तर जडेजाने 10 षटकात 40 धावा दिल्या. याशिवाय, हार्दिक पंड्याने 34 धावांत 1 तर शार्दुल ठाकूरने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : नेपाळ 48.2 षटकांत सर्वबाद 230 (आसिफ शेख 58, कुशल भुर्तेल 38, सोमपाल कामी 48, दीपेंद्र सिंग 29, गुलशन झा 23, मोहम्मद सिराज 61 धावांत 3 व रवींद्र जडेजा 40 धावांत तीन बळी). भारत 20.1 षटकांत बिनबाद 147 : रोहित शर्मा 59 चेंडूत नाबाद 74, गिल 62 चेंडूत नाबाद 67, अवांतर 6.









