विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या पात्रतेवर भारताचे लक्ष, चीनविरुद्ध सलामीची लढत
वृत्तसंस्था/राजगीर
शुक्रवारपासून येथे आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत असून यजमान भारताचा सलामीचा सामना चीनबरोबर खेळविला जाणार आहे. आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाचे लक्ष्य राहील. आशिया चषक स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरूवात होईल. आशिया चषक हॉकी स्पर्धेत यजमान भारत, चीन, जपान, कझाकस्तान यांचा अ गटामध्ये तर विद्यमान विजेता तसेच आतापर्यंत पाचवेळा आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकणारा द. कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चीन तैपेई यांचा ब गटात समावेश आहे.
तब्बल तीन दशकानंतर कझाकस्तानचा पुरुष हॉकी संघ पहिल्यांदाच आशिया चषक हॉकी स्पर्धेत यावेळी सहभागी होत आहे. पाकिस्तान आणि ओमान या दोन संघांनी शेवटच्या क्षणी या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांच्या जागी बांगलादेशला बदली संघ म्हणून संधी देण्यात आली आहे. भारताकडून ऑप्रेशन सिंदूरची अंमलबजावणी झाल्यानंतर सुरक्षेच्या समस्येवरुन पाक हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांना कळविला. राजगीरमध्ये होणाऱ्या पुरूषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये अ आणि ब गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील अंतिम सामना 7 सप्टेंबरला खेळविला जाईल. बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने पुढील वर्षी 14 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेकरिता पात्रतेसाठी भारतीय हॉकी संघाला ही शेवटची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या झालेल्या प्रो लीग युरोपियन टप्प्यामध्ये भारतीय हॉकी संघाची कामगिरी निकृष्ट झाल्याने त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारतीय हॉकी संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठीची पहिली संधी हुकली होती. प्रो लीग हॉकी स्पर्धेत 8 पैकी केवळ 1 सामना भारताला जिंकता आला तर 7 सामने गमविण्याचा पराक्रमही भारतीय हॉकी संघाने केला होता. 2025 च्या हॉकी हंगामातील राजगीरमधील आशिया चषक हॉकी स्पर्धा ही सर्वात महत्त्वाची असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक फुल्टॉन यांनी सांगितले. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे.









