अंतिम लढतीत पाकवर 23 धावांनी मात, राजपक्षचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
भानुका राजपक्षचे शानदार नाबाद अर्धशतक, वणिंदू हसरंगाची अष्टपैलू चमक आणि प्रमोद मदुशन लियानागमगेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लंकेने पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारत आशिया चषक स्पर्धेचे सहाव्यांदा जेतेपद पटकावले. हसरंगाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला तर राजपक्षला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

प्रारंभी, खराब सुरुवात झाल्यानंतरही भानुका राजपक्षने नोंदवलेल्या शानदार नाबाद अर्धशतकांमुळे लंकेने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 170 अशी आव्हानात्मक मजल मारण्यात यश मिळविले. भानुकाने 45 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 71 धावा फटकावल्या. त्यानंतर लियानागमगे, हसरंगा, चमिका करुणारत्ने यांच्या भेदक माऱयापुढे पाकिस्तानचा डाव शेवटच्या चेंडूवर 147 धावांत गुंडाळून लंकेने जेतेपद पटकावले. पाकच्या डावात सलामीवीर मोहम्मद रिझवानने एकाकी लढत देत 55 धावा जमविल्या तर इफ्तिकार अहमदने 32 धावा व हॅरिस रौफने 13 धावा जमविल्या. अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
ही स्पर्धा आधीच्या नियोजनाप्रमाणे लंकेत होणार होती. पण आर्थिक व राजकीय तणावामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आली. पण लंकेने ही स्पर्धा जिंकून त्याला योग्य न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात लंकेला अफगाणकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सांघिक खेळाच्या बळावर त्यांनी बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान व अंतिम फेरीत पुन्हा पाकिस्तान यांच्यावर मात करून हे यश मिळविले.
राजपक्षचे नाबाद अर्धशतक
पाकचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. 3 बाद 36 अशी लंकेची स्थिती करीत पाकच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थही ठरविला होता. पण अखेरच्या टप्प्यात भानुका राजपक्षने केलेल्या आक्रमणामुळे लंकेला पावणेतीनशेच्या जवळपास मजल मारता आली. त्यांनी शेवटच्या डेथ ओव्हर्समध्ये तब्बल 50 धावा झोपडल्या. युवा नसीम शाह (40 धावांत 1 बळी) व हॅरिस रौफ (29 धावांत 3 बळी) प्रभावी वेगवान मारा करीत खेळपट्टीकडून मुव्हमेंट मिळविली आणि पॉवरप्लेच्या आतच लंकेच्या फलंदाजीचा कणाच मोडला होता. पण भानुकाने कारकिर्दीतील एक सर्वोत्तम अर्धशतक नोंदवत संघाला सुस्थितीत आणले. लेगस्पिनर शदाब खानने या स्पर्धेत सातत्यपूर्ण अचूक मारा केला आहे. या सामन्यातही त्याने 4 षटकांत केवळ 28 धावा देत 1 बळी टिपला.
मात्र 5 बाद 58 अशा नाजूक स्थितीनंतर राजपक्षने प्रथम वणिंदू हसरंगासमवेत जलद 58 धावांची भागीदारी केली. त्यानंतर चमिका करुणारत्नेसमवेत आणखी 54 धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला दीडशतकाच्या पुढे मजल मारून दिली. याशिवाय दनुष्का गुणतिलकानेही 21 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. त्याने या खेळीत 4 चौकार मारले. हसरंगाने 21 चेंडूत 5 चौकार, एक षटकारांच्या मदतीने 36 धावा फटकावल्या तर राजपक्षने अखेरच्या टप्प्यात टोलेबाजी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पाकच्या हॅरिस रौफने 29 धावांत 3 तर शदाब खान, इफ्तिकार अहमद, नसीम शाह यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः लंका 20 षटकांत 6 बाद 170 ः पथुम निस्सांका 8 (11 चेंडूत 1 चौकार), कुसल मेंडिस 0 (1 चेंडू), धनंजय डिसिल्वा 28 (21 चेंडूत 4 चौकार), गुणतिलका 1 (4 चेंडू), भानुका राजपक्ष नाबाद 71 (45 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), दसुन शनाका 2 (3 चेंडू), हसरंगा 36 (21 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), चमिका करुणारत्ने नाबाद 14 (14 चेंडूत 1 चौकार), अवांतर 10. गोलंदाजी ः हॅरिस रौफ 3-29, इफ्तिकार अहमद 1-21, शदाब खान 1-28, नसीम शाह 1-40, मोहम्मद हसनैन 0-41
पाक 20 षटकांत सर्व बाद 147 ः मोहम्मद रिझवान 55 (49 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), बाबर आझम 5, फखर झमान 0, इफ्तिकार अहमद 32 (31 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मोहम्मद नवाझ 6, खुशदिल शाह 2, असिफ अली 0, शदाब खान 8, हॅरिस रौफ 13 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), नसीम शाह 4, हसनैन नाबाद 8, अवांतर 14. गोलंदाजी ः प्रमोद लियानागमगे 4-34, वणिंदू हसरंगा 3-27, चमिका करुणारत्ने 2-33, महीश तीक्षणा 1-25.









