वृत्तसंस्था /दोहा
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने कतार येथे विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर अवघ्या एक वर्षाने आशियाई चषक स्पर्धेच्या रुपाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील या देशात परतला आहे. स्पर्धेच्या 18 व्या आवृत्तीला आज शुक्रवारपासून लुसेलमध्ये सुऊवात होणार आहे. ही स्पर्धा मुळात चीनमध्ये 2023 मध्ये आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोव्हिड-19 मुळे ही योजना रद्द करण्यात आली. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्क व जिओ सिनेमावरून करण्यात येणार आहे. त्यावेळी अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यासह 2022 च्या विश्वचषक स्पर्धेची आधीच तयारी करत असलेल्या कतारची बोलीच्या दुसऱ्या फेरीतून निवड करण्यात आली आणि या फुटबॉल स्पर्धेसाठी 2024 मधील नवीन तारखा निश्चित करण्यात आल्या. कतारने 2019 मध्ये प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि ते आता आशियातील प्रमुख संघांच्या विरोधात उतरून आपले हे जेतेपद राखून ठेंवण्याचा प्रयत्न करतील.
12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भाग घेणारे दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि इराण हे विश्वचषकासाठी पात्र झालेले संघ आहेत. सौदी अरेबियाने तर कतारमधील त्याच्या सुऊवातीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध धक्का नोंदविला होता, तर जपाने बाद फेरीत प्रवेश करताना स्पेन आणि जर्मनीचा समावेश असलेल्या गटात अव्वल स्थान मिळविले होते. या स्पर्धेत 24 संघ खेळणार असून प्रत्येकी चार संघ याप्रमाणे सहा गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. साखळी पद्धतीने ही स्पर्धा सुरुवातीला खेळविली जाईल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन आणि तिसऱ्या स्थानावरील चार सर्वोत्तम संघ अंतिम 16 संघांच्या फेरीत पोहोचतील. तेथून अंतिम फेरीपर्यंत बाद पद्धतीने स्पर्धा खेळविली जाईल.









