31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार स्पर्धा : अंतिम वेळापत्रक मात्र अद्याप जाहीर नाही
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा अखेर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत कलहामुळे आशिया चषकाच्या तारखा आणि घोषणा रखडली होती. अखेर आज आशियाई क्रिकेट कौन्सिलने आशिया चषकाची घोषणा केली आहे. 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. दरम्यान, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही आशियाई क्रिकेट कौन्सिलने स्पष्ट केले. आशिया चषक स्पर्धेबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. ही स्पर्धा आता दोन देशांमध्ये आयोजित केली जाणार असून पाकिस्तानमध्ये चार सामने तर उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. यावेळी आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. या कारणासाठी, हायब्रीड मॉडेल निवडले आहे.
सहा संघांचा सहभाग
आशिया चषक स्पर्धा ही यंदा 50 षटकांची असणार आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. त्यानुसार अ गटात टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीन संघ आहेत. दोन गटामधील आघाडीचे प्रत्येकी दोन संघ सुपर फोरसाठी पात्र होतील. चारमधील आघाडीचे दोन संघ फायनलला पोहचतील. यंदा नेपाळचा क्रिकेट संघ इतिहास रचून 2023 च्या आशिया कपसाठी पात्र ठरला आहे. आशिया चषकावर टीम इंडियाचा दबदबा आतापर्यंत, आशिया चषकात टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकचे एकूण 15 वेळा आयोजन झाले आहे. यामध्ये टीम इंडियाने सर्वाधिक म्हणजेच 7 वेळा ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये भारतीय टीमने आशिया चषक पटकावला आहे. तर श्रीलंकाने आतापर्यंत सहावेळा (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) आशिया चषकाची ट्रॉफी जिंकली आहे. तर पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली ही ट्रॉफी जिंकली आहे.
पाकिस्तानमध्ये होणारे सामने
स्पर्धेतील पहिल्या गटातील चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. यामध्ये एका गटातील पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आणि दुसऱ्या गटातील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यांचा समावेश आहे.
श्रीलंकेत कोणते सामने होणार
भारत वि. पाक आणि भारत वि. नेपाळ हे सामने लंकेत ग्रुप स्टेजपासून होणार आहेत. यानंतर दोन्ही गटांतील दोन अव्वल संघ सुपर-4 मध्ये पोहोचतील. यानंतर, सुपर-4 चे सर्व सामने आणि फायनलदेखील लंकेत खेळवली जाईल.









