विश्वचषकापूर्वी ताकद पडताळून पाहण्याची संघांना संधी, क्रिकेट रसिकांना भारत – पाकिस्तान सामन्यांची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आज बुधवारपासून मुलतानमध्ये सुरू होत असून भारत व पाकिस्तानच्या क्रिकेट रसिकांसाठी या स्पर्धेचे मुख्य आकर्षण भारत व पाकिस्तान यांच्यातील तीन संभाव्य सामने राहील. त्याचप्रमाणे यात सहभागी होणाऱ्या पाच राष्ट्रांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी आपली ताकद पडताळून पाहण्याची ही अंतिम संधी आहे. ,
एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असताना आणि द्विपक्षीय मालिका वाढलेल्या असताना या स्पर्धेचेही महत्त्वही कमी झालेले आहे. मात्र बुधवारपासून सुरू होणाऱ्या यावेळच्या स्पर्धेला विश्वचषकामुळे महत्त्व आलेले आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असलेल्या विश्वचषकापूर्वी आपल्या कच्च्या दुव्यांवर काम करण्याची सहा संघांपैकी नेपाळ वगळता पाच संघांसाठी ही अंतिम संधी आहे. अर्थात, विश्वचषकापूर्वी काही द्विपक्षीय आणि सराव सामने होणार आहेत. पण श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार असलेल्या आशिया चषक स्पर्धेमुळे त्यात सहभागी होणाऱ्या संघांना विश्वचषकाच्या धर्तीवर बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळेल.
भारत सर्वांत जास्त म्हणजे सात वेळा या स्पर्धेचा विजेता राहिलेला असून आठवे जेतेपद मिळविण्याचे त्यांचे निश्चितच ध्येय राहील. परंतु त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश असलेला ‘थिंक टँक’ विश्वचषकापूर्वी संघाचे कच्चे दुवे दूर करण्यास जास्त उत्सुक असेल. के. एल. राहुलला भारतीय संघात सशर्त सामील करण्यात आले असून मुख्य प्रशिक्षक द्रविडने सांगितल्यानुसार, तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. स्पर्धेसाठी तंदुरुस्त ठरण्याच्या दृष्टीने बेंगळूरच्या त्या यष्टिरक्षक-फलंदाजासाठी मुदत झपाट्याने सरत आली आहे.
शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर राहुलने फलंदाजीत प्रगती दाखविली आहे, मात्र त्याचे यष्टिरक्षण कितपत प्रभावी राहील याविषयी साशंकता आहे. आशिया चषकादरम्यान राहुलवर बारकाईने लक्ष राहील. कारण त्याच्या उपस्थितीमुळे भारताच्या मधल्या फळीला मजबुती येईल. पल्लेकेले येथे 2 सप्टेंबर रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होईल. त्यावेळी श्रेयस अय्यरही मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. आशिया चषक संघात निवड होण्यापूर्वी श्रेयसनेही ‘एनसीए’मध्ये भरपूर सराव केलेला आहे. पण तो प्रत्यक्ष सामन्यात कशी कामगिरी करतो ते जाणून घेण्यास व्यवस्थापन उत्सुक असेल.
जसप्रीत बुमराह व प्रसिद्ध कृष्णाबाबतही अशीच चिंता असेल. या महिन्याच्या सुऊवातीला आयर्लंडविऊद्धच्या तीन सामन्यांच्या ‘टी20’ मालिकेदरम्यान या वेगवान गोलंदाजांनी दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केले. त्यांनीही त्यावेळी चांगली गोलंदाजी केली. पण एकदिवसीय क्रिकेट हे ‘टी20’पेक्षा वेगळे असते. तेथे 50 षटके क्षेत्ररक्षण करण्याच्या व्यतिरिक्त 10 षटके टाकावी लागतात. श्रीलंकेतील दमट हवामानात भारताची ही वेगवान जोडी त्यांच्यावरील वाढलेला भार कसा पेलते तेही पाहण्यास भारतीय संघ व्यवस्थापन उत्सुक असेल.
भारत आशिया चषक स्पर्धेतील मुख्य घटक राहिलेला असला, तरी पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे देखील आपल्या परीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. सहा वेळा आशिया चषक जिंकलेल्या श्रीलंकेला दुष्मंथा चमिरा, वानिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशंका यांच्या दुखापतींमुळे पूर्ण संघ उतरविण्याच्या बाबतीत भरपूर धडपडावे लागले आहे. चमिरा, कुमारा आणि मधुशंका हे ताशी 140 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतात आणि त्यांची अनुपस्थिती ही श्रीलंकेसाठी मोठी चिंतेची बाब असेल. कारण ते दीर्घ कालावधीसाठी संघाबाहेर राहू शकतात.
बांगलादेशची स्पर्धेची तयारी अनेकदा दिसून येते तशी गोंधळाच्या वातावरणात झाली आहे. जखमी तमीम इक्बाल आणि इबादत होसेन यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सहा वर्षांच्या अंतरानंतर शकीब अल हसनला वनडे कर्णधार म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. इतर संघांचा डोलारा डळमळत असताना पाकिस्तानचे चित्र मात्र आश्चर्यकारकरीत्या स्थिर संघाचे दिसत आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक असेल. कारण त्यामुळे विश्वचषकापूर्वी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका नुकतीच 3-0 ने जिंकल्यानंतर तो संघ ‘आयसीसी’ एकदिवसीय क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे
क्रिकेटमधील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान हे नवीन वैर सदर मालिकेने पुन्हा एकदा दाखविले. भारत-पाक स्तरावर ते पोहोचणे बाकी असले, तरी ते पुढे बरेच वाढू शकते अशी चिन्हे दिसलेली आहेत. आशिया चषकात कदाचित त्याचा आणखी एक अध्याय पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पुढील तीन आठवड्यांत जुने शत्रुत्व पुन्हा उफाळून येताना आणि काही नवीन नायकांचा उदय होताना दिसणार आहे. पण हे सारे विश्वचषकाच्या छायेत घडणार आहे.