भारत-पाक क्रिकेट सामना 14 सप्टेंबरला
वृत्तसंस्था / दुबई
2025 सालातील पुरुषांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अबर अमिरातमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा एसीसीचे अध्यक्ष तसेच पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी केले आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक संघातील सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाच्या या स्पर्धेतील मोहीमेला 10 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात बरोबरच्या सामन्याने होईल.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवर गेल्या काही दिवसांपासून अनिश्चिततेचे सावट पसरले होते. पण त्यानंतर अलिकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट मंडळाच्या बैठकीमध्ये सदर स्पर्धेचे वेळापत्रक घोषित करुन या स्पर्धेवरील साशंकतेचे सावट दूर केले. या स्पर्धेत सहभागी होणारे भारत आणि पाक हे दोन्ही संघ एकाच गटात (अ) आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 19 सामने खेळविले जाणार असून हे सामने दुबई आणि अबु धाबी येथे होतील. क्रिकेट शौकिनांना भारत आणि पाक यांच्यातील चुरशीचा सामना पाहण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. 24 जुलै रोजी झालेल्या एसीसीच्या बैठकीमध्ये या स्पर्धेच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या बैठकीला एसीसीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआय भूषवित आहे. भारत आणि पाक यांच्यातील संबंध तणावग्रस्त असले तरी 2027 पर्यंत हे दोन्ही संघांनी त्रयस्त ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांचा समावेश आहे. अ गटात भारत, पाक, संयुक्त अरब अमिरात व ओमान, ब गटात लंका, बांगलादेश, अफगाण आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. 2025 ची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉर्मेटमध्ये खेळविली जाणार आहे.









