ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारत धडपडत असताना एक जबरदस्त झटका बसलाय तो रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीचा…ऑफस्पिनर अश्विनचा ‘कॅरमबॉल’ हा अनपेक्षितपणे येऊन फलंदाजांची भंबेरी उडविणारा. त्याच धर्तीवर कुणी कल्पना केलेली नसताना त्यानं या घोषणेचा चेंडूही टाकला…फलंदाजी असो वा गोलंदाजी, संकटाच्या वेळी हमखास मदतीला येणारा आणि ‘बुद्धिजीवी’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. या निर्णयापर्यंत येणं त्याला का भाग पडलं त्याचा मागोवा घेतानाच त्याच्या कारकिर्दीच्या विविध पैलूंचाही घेतलेला आढावा..
ब्रिस्बेन कसोटीला पावसानं धुवून टाकलं आणि ती संपल्यानंतर तो ‘ऑफस्पिन’ टाकणारा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मासह पत्रकारांना भेटण्यासाठी दाखल झाला…मग त्यानं केला तो मोठा स्फोटच…आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्तीचा जाहीर करून…38 वर्षांचा तो अफलातून खेळाडू ताबडतोब घरी परतलाय देखील…त्याच्या या निर्णयामुळं भारताच्या ‘बॉर्डर-गावस्कर चषक मालिके’तील मोहिमेला मात्र जबरदस्त धक्का बसलाय…अनेक वरिष्ठ क्रिकेटपटू कारकीर्द संपविण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना येऊ घातलेल्या दिवसांत संघाला गरज भासेल ती कित्येक दर्जेदार खेळाडूंची…या पार्श्वभूमीवर त्याची उणीव जाणवल्याशिवाय निश्चितच राहणार नाही…रविचंद्रन अश्विन…
‘हा माझा भारतीय खेळाडू या नात्यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रकारांतील शेवटचा दिवस. माझ्यात अजूनही पंच मारण्याची काही प्रमाणात ताकद आहे. परंतु मला त्याचं दर्शन क्लब पातळीवर घडवायचंय. रोहित अन् इतर सहकाऱ्यांबरोबरच्या कित्येक चांगल्या आठवणी घेऊन मी रामराम ठोकतोय. माझ्या अनेक ज्येष्ठ मित्रांनी खेळाचा निरोप घेतलाय आणि ड्रेसिंग रूममध्ये सध्या शिल्लक आहे ती शेवटची फळी’, अश्विनचे शब्द…तो गेल्या सुमारे वर्षभरापासून निवृत्त होण्याचा विचार करत होता. दुखावलेला गुडघा नि खांदा यांनी त्याला सातत्यानं त्रास दिला व त्यात भर पडली ती न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं साफ करण्याची…
देशातील खेळपट्ट्यांवर विदेशी फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा रविचंद्रन अश्विन त्या मालिकेत एखाद्या पराक्रमाचं दर्शन अजिबात घडवू शकला नाही. त्यामुळं देखील त्याच्यावर दबाव वाढलेला असावा…शिवाय पर्थ कसोटीत त्याला संधी नाकारण्यात आली. 3 हजार पेक्षा अधिक धावा काढणारा आणि 500 हून अधिक बळी मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू. भारताची नवी कसोटी मालिका जेव्हा सुरू होईल तेव्हा अश्विनचं वय 39 वर्षांवर पोहोचलेलं असेल अन् त्यामुळं देखील त्याला संघाबाहेर लोंबकळत राहणं पसंत पडलेलं नसावं…
अश्विनच्या वडिलांनाही त्याच्या या निर्णयानं चकीत केलेलं असलं, तरी त्यांनी सनसनाटी दावा केलाय तो त्याला अपमानित करण्यात आल्याचा…या पार्श्वभूमीवर त्यानं इतक्या टोकाचा निर्णय घेण्याइतकं नेमकं घडलं तरी काय ?…दावा करण्यात येतोय त्याप्रमाणं रविचंद्रन अश्विन अंतिम संघातील स्थान निश्चित नसेल, तर ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्यास उत्सुक नव्हता. त्यामुळं संघात खेळविलं जाईल याची हमी त्यानं निवड समितीकडे मागितली होती अन् त्याला तसं आश्वस्त सुद्धा करण्यात आलं होतं असं सांगण्यात येतंय…
पण कांगारुंच्या भूमीत पाऊल ठेवल्यानंतर घडलं ते भलतंच…रविचंद्रन अश्विनला सुरुवातीलाच झटका बसला तो पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देण्यात आल्यानं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरनं घेतलेल्या निर्णयामुळं आपण पहिली पसंती नाही आहेत याची त्याला जाणीव झाली. त्यामुळं मालिकेत पुढं राहायचं की नाही हा विचार थैमान घालू लागला…त्यानंतर अश्विननं कर्णधार रोहित शर्माशी आपलं मन मोकळं करताना संघाला गरज नसल्यानं ‘बाय बाय’ केलेलं बरं असं म्हणे स्पष्टपणे सांगूनही टाकलं होतं. पण रोहितनं त्याचं मन वळविताना दिवस-रात्र कसोटीत खेळविण्याचं वचन दिलं अन् ते पाळलं देखील…परंतु तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा बाजी मारून गेल्यानंतर तामिळनाडूच्या या फिरकीपटूला आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय याची कल्पना आलेली असावी…
जरी भारत पुढील सिडनी कसोटीत दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याची शक्यता असली, तरी त्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला संधी मिळणं कठीण असल्याचं अश्विननं ताडलं…एक मात्र खरं की, महान लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या पाठोपाठ 537 कसोटी बळी मिळविणाऱ्या अश्विननं नेहमीच दर्शन घडविलं ते त्याच्या वर्चस्वाचं, बांधिलकीचं तसंच स्वत:मध्ये आवश्यक बदल करण्याच्या आणि खेळात शास्त्राrय दृष्टिकोन आणण्याच्या वृत्तीचं…भारताला मायदेशातील फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर दशकभर जबरदस्त दहशत माजविणं शक्य झालं ते रवींद्र जडेजाबरोबर जोडी जमवत बजावलेल्या प्रतापामुळंच. त्यानं विदेशी खेळाडूंची अक्षरश: दयनीय अवस्था करून टाकली…परदेशांतील खेळपट्ट्यांवर मात्र त्याला 154 बळींवरच समाधान मानावं लागलं…
रविचंद्रन अश्विननं खरं तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती ती फलंदाज म्हणून आणि कसोटी सामन्यांत सहा शतकं फटकावून त्यानं त्याची सार्थ झलकही दाखवून दिली. त्याच्या निर्णयानं मेलबर्न व सिडनी इथं होऊ घातलेल्या कसोटी सामन्यांत मात्र भारताला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार हे निश्चित…रोहित शर्माच्या मते अश्विनला आपण काय करायला हवं हे पक्कं माहीत असायचं. त्यामुळंच त्याच्यासारख्या ‘मॅचविनरनं’ आपले निर्णय स्वत:च घेणं श्रेयस्कर…अश्विननं असा पवित्रा घेऊन रवी शास्त्राrसह कित्येकांना आठवण करून दिलीय ती एम. एस. धोनीची. 2014-15 सालच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार धोनीनं मेलबर्न सामन्यानंतर असाच निवृत्त होण्याचा निर्णय अकस्मात घेतला होता…आणि आता ‘कॅरमबॉल’सह रविचंद्रन अश्विनची अनेक आयुधं पाहायला मिळतील ती फक्त ‘आयपीएल’मध्ये !

– राजू प्रभू









