ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा : पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट-रोहितला विश्रांती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली, हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली असून या दोन सामन्यात केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दीर्घ कालावधीनंतर दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री टीम इंडियाचे मुंबईत आगमन झाले. यानंतर सोमवारी सायंकाळी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी एकमताने संघ निवडला. यावेळी पहिल्या दोन सामन्यांसाठी एक आणि शेवटच्या सामन्यासाठी दुसरा संघ घोषित केला गेला. पहिल्या दोन वनडे सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह कुलदीप यादव या चार महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली गेली. पण हेच चारही फलंदाज शेवटच्या वनडे सामन्यात सामील आहेत. या तिघांचे संघात पुनरागमन झाल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी ऋतुराज गायकवाड संघात नसेल. दुखापतीतून तंदुरुस्त झालेल्या श्रेयस अय्यरची संघात वर्णी लागली आहे तर अक्षर पटेललाही तिसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी या दोन्ही खेळाडूंसाठी ही मालिका महत्वाची आहे. याशिवाय, पहिल्या दोन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान दिले आहे. मात्र, तिसऱ्या सामन्यातून या तिघांना वगळण्यात आले आहे. तसेच संजू सॅमसनची एकाही सामन्यात निवड झालेली नाही.
20 महिन्यानंतर अश्विनचे कमबॅक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांची नजर असेल तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनवर. अश्विनने भारतासाठी शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. जवळपास 20 महिन्यानंतर अश्विनचे संघात कमबॅक झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळाले. पण अश्विनला या संघात संधी न दिल्यामुळे संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. यामुळे मायदेशात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अश्विनची या मालिकेसाठी केली गेलेली निवड महत्वाची ठरु शकते.
दरम्यान, उभय संघातील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर 24 आणि 27 सप्टेंबर रोजी इंदोर आणि राजकोट येथे लढत होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिग्टंन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिग्टंन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.









