वृत्तसंस्था/ गौहत्ती
येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 100 दर्जाच्या गौहत्ती मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्विनी पोनाप्पा व तनिषा क्रेस्टो यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या जोडीचे सुपर 100 दर्जाच्या स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित जोडी अश्विनी आणि तनिषा यांनी चीन तैपेईच्या यून व हुई यांचा 40 मिनिटांच्या कालावधीत 21-13, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. चालू वर्षीच्या प्रारंभी झालेल्या अबुधाबी मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या स्पर्धेत तसेच त्यानंतर नेट्स आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत अश्विनी आणि तनिषा यांनी विजेतेपद मिळविले होते. 34 वर्षीय अश्विनी आणि 20 वर्षीय तनिषा यांनी गेल्या जानेवारीत एकत्रित खेळण्याचा निर्णय घेतला होता.









