वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अश्विनी पोन्नप्पा व तनिशा क्रॅस्टो या भारतीय जोडीने नँटेस इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या जोडीचा पराभव केला.
अश्विनी-तनिशा यांनी जेतेपदाच्या लढतीत एन त्झु व यु पेई यांच्यावर 21-15, 21-14 अशी केवळ 31 मिनिटांत मात केली. अश्विनी-तनिशा सुरुवातीला 0-4 अशा पिछाडीवर पडल्या होत्या. पण खेळ उंचावत त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीला 10-10 वर गाठले आणि हा गेम अखेर 21-15 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये अश्विनी-तनिशा यांनी अधिक वर्चस्व राखत 3-3 अशा बरोबरीनंतर सलग 7 गुण घेत हा गेम जिंकून जेतेपद पटकावले.
मिश्र दुहेरीत मात्र तनिशा क्रॅस्टो व के साई प्रतीक उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीतून आलेल्या या जोडीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अंतिम लढतीत त्यांना डेन्मार्कच्या मॅड्स व्हेस्टरगार्ड व ख्रिस्तिन बुश यांच्याकडून 21-14, 14-21, 17-21 असा 51 मिनिटांच्या खेळात पराभव स्वीकारावा लागला. आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धा या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सिरीजच्या भाग नाहीत. गेल्या जानेवारीपासून अश्विनी तनिशासमवेत खेळत आहे. या जेतेपदानंतर तिने आनंद व्यक्त केला.









